आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वीज कंपनीकडून बंद घराचे बिल ३५ हजार रुपये;  वीज कंपनीचा अजब कारभार

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष

वीज कंपनीने रीडींग न घेताच थोपवलेली वीज देयके भरण्याची सक्ती शासनाने केलेली आहे. ग्राहक वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून वीज बिलाचा भरणा देखील करत आहेत. मात्र वीज कंपनीच्या चुकीच्या बिलांचा भडीमार काही कमी होत नाही. वीज कंपनीने चुकीच्या पध्दतीने दिलेल्या बिलाचा भरणा करण्याची देखील सक्ती ग्राहकांना करण्यात येत आहे. शहरापासून जवळच असलेल्या आर्वी येथील एका ज्येष्ठ नागरिकांच्या बंद घराचे तब्बल ३५ हजार रुपये एवढे बिल वीज कंपनीने दिले आहे. शिवाय हे बिल भरावेच लागेल, अशी सक्तीच या ज्येष्ठ नागरीकाला करण्यात आली आहे. वीज कंपनीच्या उफराट्या कारभाराच्या विरोधात आता ज्येष्ठ नागरिकाने उपोषणाचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले सुकलाल दगा धनराय शहरात वास्तव्यास आहेत. शहरापासून जवळच असलेल्या आर्वी येथे त्यांनी मागील वर्षी घराचे बांधकाम केले. या घरात पत्नी इंदूबाई धनराज यांच्या नावाने वीज जोडणी घेतली आहे. बंद असलेल्या या घरात विजेचा वापरच नसल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यांत वीज कर्मचाऱ्यांला सांगून वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर जुलै महिन्यात परस्पर वीज पुरवठा सुरू करण्यात आला.

जुलैपासून डिसेंबरपर्यंत बंद असलेल्या घराचे वीज देयक १०० ते ३०० रुपयापर्यंत येत होते. हे वीज देयक धनराय अदा करत होते. मात्र मार्च २०२० पासून ते डिसेंबर २०२० पर्यंत धनराय यांच्या घराचा वीज वापर कमीत कमी ७ युनिट ते जास्तीत जास्त २० युनिट दाखवण्यात आला आहे. ही सर्व बिले अंदाजेच देण्यात येत होती. या नंतर जानेवारी महिन्यात तब्बल १ हजार ८८३ युनिट वापर दाखवत थेट २६ हजार ४३० रुपयांचे वीज बिल थोपवण्यात आले. या संदर्भात धनराय यांनी तक्रार केली. या नंतर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याने पडताळणी देखील केली. या पडताळणीत वीज मीटर बंद असून वापर नसल्याचा अहवाल देखील देण्यात आला. त्यानंतर वीज बिल कमी होईल, अशी अाशा असतांना जानेवारी महिन्याचे १ हजार ८८३ युनिटची थकबाकी दाखवण्यात आली. शिवाय फेब्रुवारी महिन्यात चक्क ६३८ युनिट वीज वापर दाखवत ३४ हजार ३५० रुपयांचे वीज बील थोपवण्यात आले आहे. या अवाजवी अाणि सदोष यंत्रणेच्या विरोधात धनराय यांनी पुन्हा तक्रार केली आहे. मात्र वीज कंपनीचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता या पैकी कोणीच दखल घेण्यास तयार नाही. उलट त्यांचा पुरवठाही खंडित केला आहे.

चुकीच्या बिलामुळे पती-पत्नी वृद्ध आणि असहाय्य
इंदूबाई आणि सुकलाल धनराय हे दोन्ही पती पत्नी अत्यंत असहाय आहेत. पालन पोषणासाठी सुकलाल धनराय यांना मिळणारा निवृत्ती वेतन हे एकमेव साधन आहे. त्यात बीपी, डायबेडीज, ह्रदयरोगाचा त्रास आहे. अशातच आता वीज कंपनीच्या चुकीच्या बिलामुळे या दांम्पत्याला वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...