आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:तळोद्यातील बाजारात साडेसहाशे बैलजोड्यांची विक्री; अवघ्या दोन दिवसांत सुमारे 60 लाखांची उलाढाल

तळोदा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांनंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गजबजली बाजार समिती; यंदा १३०० जोड्या दाखल

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार तीन राज्यांमध्ये प्रसिद्ध असून दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा भरलेल्या बाजारात पहिल्या दोन दिवसांत साडेसहाशे बैलजोड्यांची विक्री झाली. या व्यवहारातून सुमारे ६० लाखांची उलाढाल झाली आहे. बैल जोडीसाठी पर्याय म्हणून ट्रॅक्टरची संख्या वाढल्यामुळे बैल खरेदी व वापर कमी झाला आहे. मात्र तरी बाजारातील आवक पाहता ग्रामीण भागात आजही शेतीसाठी बैल हा अंतिम पर्याय म्हणून टिकून असल्याचे दिसून येते. अक्षय तृतीयेनिमित्त कालिका माता यात्रोत्सव भरतो. ही यात्रा बैल बाजारासाठी प्रसिद्ध मानली जाते. याठिकाणी बैल खरेदी-विक्री व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होते. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने गुरांना पिण्याचा पाण्याची व चाऱ्याची समस्या उद्भवत असल्याने अनेकांनी आपले सर्जे-राजे विक्रीस आणले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यंदा या बाजारात कोट्यवधीची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.

तळोदा बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या आवारात यात्रा भरवण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी पहिल्या दिवशी ८८० बैलांची खरेदी हाेऊन एकूण १ कोटी पाच लाखांची उलाढाल झाली होती. यंदा बाजारात विक्रीसाठी सुमारे १३०० बैलजोड्या आल्या आहेत. अक्कलकुवा, खापर, धडगाव या सोबतच मध्य प्रदेश राज्यातील खेतिया, पानसमेल, कवाड तर गुजरात राज्यातील डेडिया पाडा, उमरला, शेलंबा येथून विक्रीसाठी बैल जोड्या येतात. सातपुड्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील बैलांसह गुजरात आणि मध्य प्रदेशासह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावठी व ठेलारी प्रजातीचे बैल याठिकाणी विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

या माध्यमातून आर्थिक उलाढाल होऊन बाजार समितीला महसूल प्राप्त होताे. बैल बाजारानिमित्त इतर पूरक व्यावसायिकांनीही याठिकाणी हजेरी लावली आहे. बैलांसाठी खेड्यापाड्यांवरून मजुरांनी चारा विक्रीस आणला आहे. बैलांसाठी साहित्य दावण, दोर, काठ्या, खूळ आदींसह शेतीउपयोगी साहित्य विक्री हाेते.

बाजाराच्या यशस्वितेसाठी सचिव सुभाष मराठे, निरीक्षक संजय कलाल, सहायक सचिव हेमंत चौधरी, लेखापाल प्रसाद बैकर, अजय चव्हाण, जयेश सूर्यवंशी, राहुल जावरे, धनराज मराठे, हितेश धानका, संदीप उदासी, कृष्णा मराठे, शिवाजी पाटील यांनी परिश्रम घेत आहेत.

विविध १० जातीच्या बैलांना मागणी
बैल बाजारात आठ ते दहा विविध जातीचे बैल प्रामुख्याने विक्रीसाठी आले आहेत. त्यात खिलार, गावठी, केडा, मालणी, पंढरपूरी, नागमोडी, गावठी आदी प्रमुख जातींचा समावेश आहे.

तीन राज्यांच्या सीमेवरील सर्वांत मोठा बाजार
तळोदा येथील बैल बाजार फार पूर्वीपासून नदीच्या किनारी भरत होता. मात्र २०१० सालापासून माजी आमदार व बाजार समितीचे चेअरमन उदेसिंग पाडवी व संचालक मंडळाने बाजार समितीच्या आवारात बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. दर शुक्रवारी देखील येथे बाजार समितीच्या आवारात उलाढाल सुरू असते. त्यामुळे सध्या गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवरील हा सर्वात मोठा बाजार म्हणून प्रसिद्धीस आला आहे.

बैलबाजारात केळी जोडीचे आकर्षण
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात शेती करत असताना उंच टेकडीवर शेती करावी लागते. तेथे चढण्यासाठी गावरान जोडी, ज्याला ‘केळी’ नावाने आेळखतात. या प्रजातीचे बैल उंचीने कमी असतात.

बातम्या आणखी आहेत...