आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ओला व कोरडा कचरा वेगळा करण्यावर भर दिला जातो आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाईल. त्यासाठी आत्मनिर्भर प्रभाग अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत प्रभागात उत्पादित होणारा कचरा प्रभागातच नष्ट करणे हा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये हे अभियान राबवले जाईल.
या प्रभागात रोज उत्पादित होणाऱ्या अडीच टन कचऱ्यावर प्रभागातच लोकसहभागातून प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत केले जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर अन्य प्रभागात हे अभियान राबवले जाईल. ओला व कोरडा कचरा संकलित करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
शहरातील विविध भागातून जमा होणारा कचरा वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोत टाकला जातो. या ठिकाणी आता कचरा टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आता आत्मनिर्भर वाॅर्ड अभियान राबवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग क्रमांक १६ मध्ये ते राबवले जाईल. या प्रभागात फाशीपूलपासून ते चितोड गावापर्यंत, गोळीबार टेकडीसह मिल परिसराचा समावेश आहे. या प्रभागात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रभागातच प्रक्रिया केली जाईल. लोकसहभागातून हे अभियान राबवले जाईल.
याविषयी महापालिका काही दिवसांपासून या प्रभागात जागृती करते आहे. नागरिकांना त्यांच्या घरात जमा होणारा ओला कचरा घराच्या परिसरातील मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात टाकावा लागेल. या कचऱ्यापासून सेंद्रिय खत कसे तयार करावे याची माहिती महापालिकेतर्फे दिली जाईल. खत तयार झाल्यावर त्याचा नागरिकांनी त्यांच्या घराजवळील उद्यानात वापर करणे अपेक्षित आहे. ज्यांना या खताचा वापर करता येणार नाही त्यांच्याकडून महापालिका शासकीय दराने खत विकत घेणार आहे. खत निर्मितीचा प्रयोग व्यक्तिश: किंवा समूहानेही करता येणार आहे.
दर माणसी ३२५ ग्रॅम ओला कचरा
शहरातून रोज साधारणपणे ६० टन ओला कचरा संकलित होणे अपेक्षित आहे. दर माणसी ओल्या कचऱ्याचे प्रमाण ३२५ ग्रॅम आहे. ओल्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न होणार आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक १६ मध्ये आत्मनिर्भार वॉर्ड अभियान राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
असे तयार करावे लागेल खत
या अभियानांतर्गत घर, हॉटेल, मंगल कार्यालयात जमा शिळे अन्न, हिरव्या पालेभाज्या व घरातील परसबागेत जमा होणाऱ्या पाल्या पाचोळ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करावी लागेल. नागरिकांना प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा घराच्या आवारातील मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात रोज ओला कचरा टाकावा लागेल. खड्डा भरल्यावर तो बुजवावा लागेल. तीस दिवसांनंतर खत तयार होईल.
रोज ४ टन कचरा निर्मिती
प्रभाग क्रमांक १६ मध्ये रोज ४ टन कचरा उत्पादित होतो. त्यात अडीच टन ओला व दीड टन कोरड्या कचऱ्याचा समावेश आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. दरम्यान, शहरात रोज सुमारे ११० टन कचरा उत्पादित होतो. हा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून जमा केला जातो. त्यानंतर कचरा डेपोमध्ये टाकला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.