आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनपा दवाखान्यात न्यूमाेनियाच्या लसीचा तुटवडा; बालरुग्ण वाढले

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून न्यूमोनिया प्रतिबंधक लस संपली आहे. या लसीचा काही दिवसांपासून तुटवडा जाणवत होता. त्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. मनपा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी केली असून, अद्याप लस प्राप्त झालेल्या नाही, अशी माहिती देण्यात आली. शासनाने गेल्या वर्षापासून राष्ट्रीय लसीकरणात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या न्यूमोनिया प्रतिबंधक लसीचा समावेश केला. त्यानुसार दीड महिने व साडेतीन महिन्याच्या लहान मुलांना निमोव्होकल कॉनझ्युवेंट ही लस दिली जाते.

खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस घेण्यासाठी साधारणपणे २ हजार ५०० रुपये खर्च करावे लागतात. महापालिकेच्या दवाखान्यात ती मोफत दिली जाते. महापालिकेकडे या लसीचा साठा संपुष्टात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. महापालिकेला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ही लस प्राप्त हाेते. त्यानुसार मनपाने जिल्हा परिषदेकडे तीन हजार लसींची मागणी केली आहे. पण गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत मनपाला लस प्राप्त झाली नव्हती.

महिन्याला ७०० बालकांचे लसीकरण
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे महिन्यात १७६ लसीकरण सत्र घेण्यात येतात. या सत्रात साधारणपणे ७०० बालकांचे न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरण होते. दरम्यान, मनपा दवाखान्यात शून्य ते १५ वर्षांच्या बालकांना विविध प्रकारच्या नऊ लस देण्यात येतात. न्यूमोनिया वगळता अन्य लस उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

ही आहे न्यूमोनियाची लक्षणे
सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, दम लागणे आदी न्यूमोनियाची लक्षणे आहे. त्यामुळे अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. एक्स-रे व रक्ताच्या काही तपासण्या केल्यानंतर या आजाराचे निदान करता येते.

जिल्ह्याला मिळतात ३० हजार लस
शासनाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लसींचा पुरवठा होतो. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालय, महापालिकेला लस दिली जाते. जिल्ह्यासाठी वर्षभरात न्यूमोनिया प्रतिबंधक ३० हजार लस प्राप्त होतात. लस उपलब्धतेनुसार त्यांचे वितरण करण्यात येते.

गुरुवारी सायंकाळी मिळाली लस
शहरासह जिल्ह्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या न्यूमोनिया प्रतिबंधक लसीचा काही दिवसांपासून तुटवडा आहे. गुरुवारी सायंकाळी लस प्राप्त झाली. लसींचे तातडीने वितरण होईल. -डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

गरम कपडे वापरा
न्यूमोनियाची लागण होऊ नये यासाठी शरीर उबदार राहण्यासाठी गरम कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर थंड पदार्थ खाणे टाळणे, वाफ घेणेही फायदेशीर ठरते.

शहरात बालरुग्णांची संख्या २० टक्के वाढली
शहराच्या वातावरणात बदल झाला आहे. रात्रीचे तापमान कमी झाल्याने थंडी जाणवते आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे. न्यूमोनियाग्रस्त बालकांचे प्रमाण काही दिवसांपासून २० टक्के वाढले आहे. त्याचबरोबर श्वसनाचे विकार, छातीत पाणी होणे, बालदम्याचे रुग्णही आढळत आहे. एक दिवस ते १४ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा त्रास दिसून येतो आहे. -डॉ. अभिनय दरवडे, सदस्य, राज्य बालरोगतज्ञ संघटना

बातम्या आणखी आहेत...