आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:दीड हजार नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल ; वर्षभरात केली दीड कोटी युनिट वीज निर्मिती

अमोल पाटील | धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. त्यातून भारनियमन होते. दुसरीकडे विजेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा भुर्दंड बसतो. वीज संकटावर मात करण्यासाठी हरित ऊर्जा उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात १ हजार ४९५ वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या ग्राहकांनी वर्षभरात दीड कोटी युनिट वीज निर्मिती करत वीजबिलातून मुक्ती मिळवली. तसेच निम्मी वीज महावितरणला विक्री करून उत्पन्नही मिळवले.

केंद्र सरकारतर्फे छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. सोलर पॅनलद्वारे रोज १ ते ८ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. जिल्ह्यात १ हजार ४९५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी सौरऊर्जा पॅनल बसवले आहे. या माध्यमातून वर्षभरात १ कोटी ४० लाख २६ हजार ३९४ युनीट वीज निर्मिती झाली. त्यापैकी ७० लाख ६७ हजार ३६९ युनिट वीज निर्यात तर ८६ लाख १८ हजार १०३ युनिट आयात झाली. त्यामुळे ग्राहकांना वीज बिलातून मुक्ती मिळाली. सौर वीज निर्मिती यंत्रणा २५ ते ३० वर्षे देखभाल विरहित असते. सौर पॅनल उभारण्यासाठी ७० हजार रुपये प्रती किलो वॅट इतका खर्च येतो. त्यासाठी शासनाकडून कर्ज व सबसिडीही मिळते.

अशी होते वीज निर्मिती अन् विक्री
सौर पॅनलद्वारे तयार झालेली वीज डीसी अर्थात डायरेक्ट करंट पद्धतीची असते. इन्व्हर्टरचा वापर करून या विजेचे एसी अर्थात अल्टरनेट करंटमध्ये रूपांतर हाेते. ही वीज थेट महावितरणच्या ग्रीडला जोडली जाते. ग्राहक व वीज कंपनीच्या यंत्रणेला एक टू-वे नेट मीटर जोडले जाते. या मीटरमध्ये महावितरणच्या ग्रीडला जाणाऱ्या विजेची नोंद व महावितरणच्या ग्रीडमधून ग्राहकाकडे येणाऱ्या विजेची नोंद असते. ग्राहकाने वीज कंपनीकडून घेतलेली वीज आणि वीज कंपनीला दिलेली वीज हा फरक तपासून वीज देयके तयार हाेते. गरजेप्रमाणे वीज वापरून निर्माण झालेली अतिरिक्त वीज कंपनीला विक्री करता येते.

धुळे शहरात सर्वाधिक सौर पॅनल
जिल्ह्यात वीज कंपनीचे तीन विभाग आहे. धुळे शहर विभागात सर्वाधिक १ हजार १८७ ग्राहकांनी सौरऊर्जा पॅनल बसवले आहे. या पॅनलमधून १ कोटी १० लाख ४० हजार ६३८ युनिट वीजेची निर्मिती वर्षभरात झाली. दोंडाईचा विभागात २४६ ग्राहकांनी पॅनल बसवले आहे. त्यातून २४ लाख ६ हजार ८०२ युनिट वीज निर्मिती झाली. धुळे ग्रामीण विभागात ६२ ग्राहकांकडे सोलर सिस्टीम आहे. त्यातून ५ लाख ७८ हजार ९५४ युनिट वीज निर्मिती झाली.

असे मिळते अनुदान : तीन किलोवॅटपर्यंत सोलर पॅनेल बसवल्यावर ४० टक्के, १० किलोवॅटपर्यंत २० टक्के सबसिडी मिळते. दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारण एक लाखापर्यंत खर्च अपेक्षित असतो. त्यावर ४० टक्के सबसिडी मिळते. घरगुती सोलर पॅनल बसवताना घरात किती वीज लागते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. घरात २ ते ३ पंखे, एक फ्रिज, ६ ते ८ एलईडी, एक पाण्याची मोटर आणि टीव्ही आदी उपकरणासाठी दिवसांत ६ ते ८ युनीट वीज लागते.

शासकीय इमारतींसह अपार्टमेंटही पुढेच
अपार्टमेंट, खासगी रुग्णालये, घरांवर सोलर सिस्टिम बसवण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये ग्रीन बिल्डिंग योजनेंतर्गत सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आता केंद्र शासनाकडून थेट सबसिडी मिळत असल्याने योजनेला प्राेत्साहन मिळत आहे.
ज्ञानेश्वर अर्दड, जनसंपर्क अधिकारी, जळगाव झोन

बातम्या आणखी आहेत...