आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापूस पिकावर बोंडअळी, लाल्या सारख्या संकटावर मात करण्यासाठी मे नंतर कापूस लागवडीचे आवाहन कृषी विभागाने केले. त्यामुळे ३१ मेपर्यंत कापूस बियाणे विक्रीवर देखील निर्बंध होते. परिणामी ३१ मेपर्यंत मागणीच्या तुलनेत जिल्ह्याला ३५ टक्के कापूस बियाण्यांचा पुरवठा झाला. दरम्यान १ जूनपासून जिल्ह्यात कापूस बियाणे विक्रीला अधिकृत सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या भरारी पथकाने काही निविष्ठा विक्रेत्यांकडे चौकशी केल्यामुळे पहिल्या दिवशी शांतता राहिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात चार लाख १६ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड प्रस्तावित आहे. या पैकी दोन लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड अपेक्षित आहे. जिल्ह्यात १५ मे नंतर बागायती कापूस लागवड करण्यात येते. मात्र यामुळे कापूस पिकावर लाल्या रोगासह बोंडअळीचेदेखील संकट असते. शेंदरी बोंडअळीला आळा घालण्यासाठी या हंगामात १ जूनपर्यंत लागवड करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. तसेच तत्पूर्वी कापूस बियाणे विक्रीवरदेखील प्रतिबंध होते. मात्र असे असताना काही ठिकाणी कापूस बियाणे विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारीमुळे सोमवारी पुणे येथील विशेष पथकासह स्थानिक पथकाने धुळे तालुक्यात तसेच शिरपूर तालुक्यात काही दुकानांची पाहणी केली.
मात्र कारवाईच्या धाकाने ३० आणि ३१ मे रोजी दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, बुधवारी १ जूनपासून अधिकृतरीत्या बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी कृषी विभागाने काही दुकानांची पाहणी देखील केली. मात्र गैरकाही आढळून आले नाही. दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तयारीवर भर दिला आहे. आता सर्वांच्या नजरा पाऊस कधी होतो याकडे लागल्या आहेत. यंदा हवमान विभागाने पाऊस लवकर होईल, असा अंदाज वर्तवला होता पण अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही.
कपाशीच्या ३ लाख ४७ हजार पाकिटांचा आत्तापर्यंत पुरवठा
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४७ हजार ३०० कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला आहे. धुळे तालुक्यात तीन लाख ६४ हजार ७५७ पाकिटांची मागणी आहे. त्या तुलनेत १ लाख २ हजार उपलब्ध झाले. तर साक्री तालुक्यात १ लाख १२ हजार ४२१ च्या तुलनेत ३५ हजार, शिंदखेडा तालुक्यात ३ लाख ५७ हजार ४०३ च्या तुलनेत एक लाख ४ हजार तर शिरपूर तालुक्यात ३ लाख ४५ हजार १२९ च्या तुलनेत एक लाख ६ हजार ३०० पाकिटांची उपलब्धता झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.