आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरगरीब उपाशी राहू नये यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या काळात राज्यभरात शिवभाेजन केंद्र सुरू झाले. सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना सुरू ठेवली असली तरी चार महिन्यांपासून शिवभाेजन केंद्रांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले आहे. शिवभाेजन केंद्रासाठी जिल्ह्याला दरमहा ३९ लाख रुपये अनुदान मिळते. चार महिन्यांचा विचार केला तर दीड कोटींचे अनुदान थकले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागात शिवभाेजन थाळी केंद्र सुरू झाले. या केंद्रात केवळ दहा रुपयांत भोजन मिळते. कोरोना काळात १६ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी मोफत करण्यात आली. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर पुन्हा १० रुपयांत भोजन दिले जाते आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३२ शिवभाेजन केंद्र सुरू आहे. त्यात धुळे शहरात २४ तर उर्वरित केंद्र शिंदखेडा, शिरपूर, साक्री तालुक्यात आहे. या केंद्रातून रोज ३ हजार १९० शिवभाेजन थाळींचे वाटप होते. प्रत्येक केंद्राला दीडशे, दोनशे थाळी वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. शहरातील शिव भोजन केंद्र चालकाला प्रत्येक थाळीमागे ४० तर ग्रामीण भागातील केंद्र चालकाला २५ रुपये अनुदान मिळते. दर १५ दिवसांनी अनुदान केंद्र चालकांना वाटप करण्याची शासनाची सूचना आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातर्फे ही योजना राबवली जाते. जिल्ह्यात दरमहा ३९ लाख रुपये अनुदानापोटी केंद्रचालकांना दिले जातात. शहरी भागातील केंद्र चालकांना २१ नोव्हेंबर तर ग्रामीण भागातील केंद्र चालकांना १६ डिसेंबरला शेवटचे अनुदान मिळाले होते. त्यानंतर अनुदान मिळालेले नाही.
पाठपुरावा पण उपयोग नाही
थकीत अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला जातो आहे. पण शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ३२ शिव भोजन केंद्र चालकांचे दीड कोटींचे अनुदान रखडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
उसनवारी करण्याची आली वेळ
शिवभोजन केंद्र चालकांना काही महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. भाजीपाला, किराणा विकत घेण्यासाठी उसनवारीने पैसे घ्यावे लागता आहे. त्यामुळे शासनाने केंद्र चालकांना नियमित दरमहा अनुदान द्यावे. - शेखर वाघ, संचालक, शिवभोजन केंद्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.