आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक:तळोद्यात स्टेट बँकेच्या ग्राहकांना एटीएमच्या तांत्रिक बिघाडाने ‘ताप’ ; अनेक महिन्यांपासून प्रश्न कायम

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमधून ग्राहकांना पैसे काढताना मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम मशीन काही ग्राहकांचे एटीएम कार्ड वाचते (रीड) तर काहींचे नाही. त्यामुळे पैसे मिळत नाही. बँक खात्यात पैसे असून काही उपयोग होत नसल्याने मशीनमधून पैसे काढण्यासाठी नशीब लागते, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. यामुळे प्रचंड गैरसोय होत असून एटीएमशी संबंधित ही तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. नवीन वसाहतीत न्यू हायस्कूल शेजारी स्टेट बँकेची शाखा असून, तेथे स्वतंत्र खोलीत एटीएम मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन उपलब्ध केले आहे. बँकेत शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिकांची खाती मोठ्या संख्येने आहेत. बहुतांश ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएमच वापरतात. त्यामुळे नेहमीच गर्दी असते. मात्र काही महिन्यांपासून स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ग्राहकाने त्यात कार्ड टाकल्यावर ‘टेक यूअर कार्ड, कार्ड नॉट रीड’ असा मेसेज येतो. कार्ड रीड न केल्याने ग्राहकांना पैसे मिळत नाही. कधी तरी नशिबाने एखाद्या ग्राहकाचे कार्ड मशीन ‘रीड’ करते व त्यास पैसे मिळतात. अन्य ग्राहकांना मात्र इतर बँकांचे एटीएम धुंडाळावे लागते.

पैसे भरणे व काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी दरम्यान येथील स्टेट बँकेच्या शाखेत व्यवहारासाठी ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते. याठिकाणी खात्यात पैसे भरण्यासाठी तसेच काढण्यासाठीही एकच काउंटर असल्याने ग्राहकांना एक ते दोन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे पैसे भरणे व काढणे यासाठी ग्राहकांना स्वतंत्र काउंटरची सोय उपलब्ध करावी. जेणेकरून त्यांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही, अशीही ग्राहकांची मागणी आहे.

वरिष्ठांना कळवले, अभियंत्यांसही केले अवगत यासंदर्भात तळोदा शाखा व्यवस्थापक अनिल सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी पाहता वरिष्ठ पातळीवर त्याबाबत कळवले आहे. तसेच तांत्रिक अभियंत्यांना देखील अवगत केले आहे. लवकरच ग्राहकांना येणारी अडचण दूर होईल.

बातम्या आणखी आहेत...