आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सेंट्रल बँकेच्या प्रतापपूर शाखेकडून सक्तीने कर्ज वसुली त्वरित थांबवा; डीआरडीए प्रकल्प संचालक व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

तळोदाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील प्रतापपूर सेंट्रल बँकेच्या शाखेकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत २०११-१२ मध्ये वाटप करण्यात आलेल्या कर्जाची सक्तीने वसुली करण्यात येत असून ही वसुली थांबवावी या मागणीचे निवेदन प्रतापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राजेंद्र पाटील तथा तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांना देण्यात आले आहे.

प्रतापपूर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०११-१२ मध्ये डीआरडीए यांच्यामार्फत गायी मंजूर करण्यात आलेल्या असून हे कर्ज प्रतापपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून वितरित करण्यात आले होते. या कर्जाचे हप्ते आम्ही दूध डेरी मार्फत आम्ही नियमित भरत होतो. कालांतराने गायी मरण पावल्या व आमच्या अर्थार्जनाचे स्त्रोत थांबले. डीआरडीए मार्फत देण्यात आलेल्या गायींचे कोणत्याही प्रकारची विमा नव्हता.

त्यामुळे हे कर्ज अद्याप आमच्या नावावर दिसत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असून प्रतापूर सेंट्रल बँक सेंट्रल बँकेच्या वतीने आमच्या इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजनाचे पैसे सेंट्रल बँक प्रतापपुरच्या शाखेत जमा होतात. या रकमेतून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालत असताना बँकेचे अधिकारी बचत खात्यातून हे कर्ज परस्पर वसूल करत आहेत. तरी आपण पंचायत समिती मार्फत हे कर्ज माफ करण्यात यावे. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापपूर येथील बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्ज वसुली बंद करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे.

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते व भिमक्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश इंद्रजीत हे उपस्थित होते. निवेदनावर बहादूर ठाकरे, हरी मोरे, जयसिंग मोरे, रमेश पाडवी, कृष्णा नाईक, दंगल मोरे, गणेश प्रधान, सखुबाई मोरे, सीताराम मोरे, हिरामण पाटील, जत्र्या पाडवी, पंडित कोळी, भरत नाईक, सुभाष वळवी, शिवाजी वळवी, मंगला मोरे आदींसह गावातील नागरिकांच्या सह्या व अंगठे आहेत.