आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानम्रता... आईचा मृतदेह घरात असतानाच अर्थशास्त्राचा पेपर देऊन मिळवले ५४ गुण
नंदुरबार | बारावीच्या तिसऱ्या पेपरला आई अपघातात वारली. घरात आईचा मृतदेह असताना नम्रता काशिनाथ गवळी हिने अर्थशास्त्रचा पेपर दिला. आता ती उत्तीर्ण झाली असून, तिला ६६.८३ टक्के गुण मिळाले असून अर्थशास्त्र विषयातही तिने ५४ गुण मिळवले आहेत. आईचा मृतदेह घरात असताना मानसिकता खराब झाली होती. पेपर द्यायचा नाही, असे ठरवले होते. मात्र वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षकांनी आग्रह धरला. त्यामुळे रडत रडतच पेपर लिहिला, असे नम्रताने सांगितले.
श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी नम्रता काशिनाथ गवळी हिचा भाऊ कोपरगावला गुरुकुलला शिक्षण घेत आहे. १८ मार्च रोजी वडील काशिनाथ गवळी हे आई रत्ना गवळी यांना घेऊन कोपरगावला पालक मेळाव्यात हजेरी लावण्यासाठी घरातून सकाळी आठ वाजता मोटारसायकलीने रवाना झाले. त्याच दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुसुंब्याजवळ मोटारसायकल खड्ड्यातून पडल्याने आई दगडावर आपटली. मेंदूला मार लागल्याने तिचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी अर्थशास्त्रचा पेपर होता.
घरात आईचा मृतदेह होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अर्थशास्त्रचा पेपर लिहिला. पेपर लिहिताना अश्रू टपकत होते. हुंदका दाटून येत होता. मन:स्थिती नव्हती. जेमतेम पेपर लिहिला. पेपर लिहून आल्यानंतर घरी आले. त्यानंतर आईवर अंत्यसंस्कार झाले. आई असती तर मला अधिक गुण मिळाले असते. मी पास झाल्यानंतर आईने मला पेढा भरवला असता. आज ती नाही, अशी खंत नम्रताने व्यक्त केली. प्रेत घरात असतानाही तिने शिक्षकांच्या अाग्रहाने पेपर दिला होता.
खगेंद्र... आधी आईचे निधन, नंतर कोरोनात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भिक्षुकी करून मिळवले ७४ टक्के
नंदुरबार | आई व वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रकाशा (ता.शहादा) येथील एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या खगेंद्र प्रकाश कुळकर्णी याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वाणिज्य शाखेत ७४ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. आई भारती प्रकाश कुळकर्णीचे २०१३ मध्ये निधन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वडील प्रकाश अनंत कुळकर्णींचेही निधन झाले.
खगेंद्र कुळकर्णी सध्या मामा चंद्रकांत देवळालीकर यांच्याकडे राहतो. आई व वडिलांच्या निधनानंतर मामा, शिक्षक यांचे सहकार्य त्याला लाभत गेले. आई-वडिलांच्या निधनानंतर खगेंद्र हा प्रकाशे सोडून नंदुरबारला मामाकडे राहायला आला. त्याची बहीणही मामाकडे राहते. वडील वारले तेव्हा खगेंद्र अकरावीत होता. बारावीत त्याने खूप अभ्यास केला. वाणिज्य शाखेत त्याला चांगले गुण मिळाले. वडिलांच्या विमा पॉलिसीने त्याला आधार दिला. शिक्षक,मामांनी त्याला साथ दिली. आता अभ्यासासोबतच भिक्षुकी, पुरोहितांचा व्यवसाय करीत आहे. विविध शहरात जाऊन तो पौरोहित्य शिकत आहे.
हिमायू... जीवशास्त्र विषयात मिळाले १०० पैकी १०० गुण
शहादा | शहरातील कै.जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या एकूण निकाल ९९.४० % लागला विद्यालयात विज्ञान शाखेत हिमायू सदाशिव चव्हाण ९१.१७ मिळवून प्रथम आली आहे. तर जीवशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील व संचालक अभिजित पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.