आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोड उसाची कडू कहाणी:जानेवारीत निघणाऱ्या उसाची एप्रिल उजाडूनही तोडणी नाही; शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक संकटात, ऊस तोडणी यंत्र चालकांकडून होतेय आर्थिक पिळवणूक

शिरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यात हजारो एकर जमिनीवर उसाची लागवड झाली आहे. दुसरीकडे १२ वर्षांपासून तांत्रिक अडचणींच्या गर्तेत अडकलेला शिरपूर सहकारी साखर कारखाना अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्याबाहेरील कारखानदार तालुक्यात ऊस तोडणीसाठी मजूर पाठवून ऊस खरेदी करतात.

यंदा मजुरांची टंचाई जाणवत असल्याने बाहेरील कारखानदारांनी शिरपूर तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या बड्या शेतकऱ्यांनी वजन वापरून जवळच्या कारखानदारांकडून यंत्राद्वारे ऊस तोडणी केली. मात्र, लहान शेतकऱ्यांच्या उसाची एप्रिल उजाडला तरी तोडणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.

शिरपूर तालुक्यात अद्यापही ३० ते ५० टक्के ऊस तोडणीअभावी शेतात आहे. गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला तरीही ऊस शेतात उभा असल्याने आणि आता उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. ऊस तोडणीसाठी शेतकरी स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत बाहेरील कारखान्यांना विनंती करत आहे. सर्वसाधारण स्थितीत जानेवारी महिन्यात ऊसतोडणी झाली पाहिजे. तसे झाले तरच उसाला उतारा (वजन) चांगला मिळतो. जानेवारीत तोडणी होणाऱ्या उसामध्ये रसाचे प्रमाण चांगले असते.

त्यामुळे कारखानदार उसाला चांगला भाव देतात. ऊस वेळेवर तोडला नाही तर एकरी ५० ते ६० टन वजन उसाचे केवळ ३० ते ४० टन वजन भरते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऊस तोडणी झाली तरी समाधानकारक भाव मिळेल या आशेवर शेतकरी ऊसतोडणीच्या प्रतीक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...