आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:आजोबांच्या खुनाचा संशय; चुलत आजोबांचा खून करून बदला

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वार येथे संतप्त ज्ञानेश्वर पारधी नामक नातवाने आजोबांचा डोक्यात सुऱ्याने वार करुन खून केला. ही घटना शुक्रवारी घडली. आत्माराम पारधी असे मृत आजोबांचे नाव आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वर पारधी पसार झाला आहे. सुमारे १५ वर्षापूर्वी झालेल्या आजोबांच्या खूनात आत्माराम पारधी यांचा हात असल्याच्या संशयावरुन हा खून करण्यात आल्याचे सायंकाळी समोर आले. त्यावरुन पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वार येथे आत्माराम हिरामण पारधी ( वय ६८) हे राहतात. गावात त्यांच्या पुतणीचा मुलगा ज्ञानेश्वर दगडू पवार-पारधी हा देखील राहतो. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील तो रहिवासी आहे. गावातील पारधीवाडा या ठिकाणी कालिका मातेचे मंदीर आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर आजीकडे आला. त्याच्या घराजवळ राहणारे आत्माराम पारधी यांच्याशी त्याची भेट झाली. जुन्या कारणावरुन ज्ञानेश्वरने पुन्हा भांडण सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत त्याने आजाेबा आत्माराम पारधी यांच्या डोक्यात सुऱ्याने वार केला. त्यामुळे आत्माराम पारधी गंभीर जखमी होवून मृत झाले. घटनेनंतर ज्ञानेश्वरने पळ काढला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस त्याचा शोध घेण्यात गुंतले होते.

या खूनाच्या मागे सुरवातीला पूजेला विरोध करण्याचे कारण समोर आले होते. त्यानंतर सायंकाळी या खून प्रकरणाने कलाटणी घेतली. ज्ञानेश्वरच्या आजोब भाईदास उखडू पारधी यांचा २००६ मध्ये खून झाला होता. तो खून आत्माराम पारधी यांनी तो केल्याचा त्यांच्यावर संशय होता. या संशयातून व खूनचा बदला घेण्यासाठी ज्ञानेश्वरने आत्माराम पारधी यांचा खून केल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलिस पथक गावात दाखल झाले. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडून त्यांनी मृत व संशयित ज्ञानेश्वरची माहिती घेतली.

कौटुंबिक स्थिती
मृत आत्माराम पारधी यांना पाच मुले आहे. त्यापैकी दोन जण राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत आहे. एक मुलगा धुळे पंचायत समितीमध्ये लिपीक आहे. एकाचे गावात दुकान असून अन्य एकाचे वाहन आहे. संशयित ज्ञानेश्वर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे, अशी माहिती निकटवर्तियांनी दिली.

पूजेचे कारण पडले मागे
कालिका देवी मंदीरात ज्ञानेश्वर पूजेसाठी यायचा. ज्ञानेश्वर हा नातू असला तरी तो अन्य कुळातील व दुसऱ्या गावाचा रहिवासी आहे. त्यामुळे देवीची पूजा अर्चना करण्यास त्याला विरोध होता. त्यामुळे त्याने खून केल्याचे कारण प्रथम समोर आले होते. पश्चिम देवपुर पेालिसांनी संशयिताचा शोध घेत सत्य समोर आणले.

पूर्वीपासून होता राग
आजोबांच्या खूनामागे आत्माराम पारधी यांचा हात असल्याचा ज्ञानेश्वर याला संशय होता. त्यामुळे त्याचा राग होता. शिवाय अधूनमधुन काही वाद ही झाले हाेते. त्यामुळे ज्ञानेश्वरने आत्माराम पारधी यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक, पश्चिम देवपुर पोलिस स्टेशन

बातम्या आणखी आहेत...