आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या उत्तरकार्याला आजोळच्या खान्देशी पुरणपोळ्या अन् कुरडयाही

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगेशकर भगिनींची इच्छा धुळ्याच्या राजश्री शिंदेंकडून पूर्ण

खान्देशात उत्तरकार्याला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. खान्देशची हीच परंपरा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या उत्तरकार्याला जपण्यात आली. त्यासाठी पुरणपोळ्या व कुरडयाही धुळ्याहून मुंबईला पाठवण्यात आल्या. ज्या थाळनेर गावात दीदींनी बालपणाचे काही क्षण व्यतीत केले त्याच खान्देशची परंपरा मंगेशकर कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या क्षणीही जपली.

थाळनेर (ता. शिरपूर) हे लतादीदींचे आजोळ. त्यामुळे खान्देशी परंपरा त्यांना व मंगेशकर कुटुंबीयांना माहीत आहेत. अक्षय्य तृतीया व उत्तरकार्याला पुरणपोळीचे जेवण केले जाते. दीदींच्या उत्तरकार्यालाही पुरणपोळीचे जेवण मिळावे, अशी अपेक्षा मंगेशकर भगिनींची होती. हा योग जुळवून आणला विजय सनेर यांनी. तेही धुळ्यातले आणि सध्या महसूलमंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात आहेत. सांत्वनासाठी ते मंगेशकर कुटुंबीयांकडे गेले असताना तिथे खान्देशातील पुरणपोळीचा व कुरडयांचा विषय उषा व मीना मंगेशकर यांनी काढला आणि लगेच ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सनेर यांनी उचलली.

२५० जणांसाठी पुरणपोळी
धुळ्यात एका बचत गटाच्या संचालिका राजश्री किशोर शिंदे यांनी २५० जणांसाठी पुरणपोळ्या, कुरडया तयार करून त्या धुळ्याहून मुंबईला रवाना केल्या.

खान्देशसाेबतचे नाते अतूट
आम्ही दीदींच्या उत्तरकार्याला खान्देशच्या पुरणपोळ्या व कुरडया पाठवल्या. या माध्यमातून आम्हाला लतादीदींना श्रद्धांजली वाहता आली याचे समाधान आहे. मंगेशकर कुटुंबीयांचे खान्देशशी असलेले नाते अतूट आहे, अशा भावना राजश्री शिंदे यांनी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...