आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील कावठी शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी मद्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ९ जणांना अटक झाली. मद्यतस्कर दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाड, अनेक गुन्हे दाखल असलेला गुलाब शिंदे व राहुल अहिरराव नामक शिक्षकाने हा कारखाना थाटला होता. या ठिकाणी अहमदनगरमधील प्रवरा येथे उत्पादित होणाऱ्या रॉकेट संत्रा नामक मद्याप्रमाणे बनावट मद्य केले जात होते. त्याची विक्री विदर्भात होत होती. निवडणुकीशी बनावट मद्याच्या कनेक्शनचा अंदाज आहे.
धुळे तालुक्यात कावठे शिवारात सन २०१८ मध्ये सुरू झालेल्या एका क्लबमध्ये बनावट मद्याचा कारखाना होता. या ठिकाणी एलसीबी, धुळे तालुका व सोनगीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. या वेळी शांतिलाल उत्तम मराठे (वय ४८, रा. शिरपूर), सागर बापू भोई, सुनील सुधाकर देवरे, सचिन सुधाकर देवरे, नितीन रंगनाथ लोहार (सर्व रा. शिरुड, ता. धुळे), ज्ञानेश्वर बाबूसिंग राजपूत (रा. दहिंदुले, जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेेण्यात आले. कारखान्यातून अद्ययावत मशीन, आरओ फिल्टर, स्पिरीटने भरलेले ३० ड्रम, बनावट मद्याच्या १ हजार बाटल्या, सुमारे २० हजार बूच, साडेतीन हजार रिकाम्या बाटल्या, ३ वीज मोटार, जनरेटर व दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या कामगारांसह मास्टर माइंड दिनेश निंबा गायकवाड (दोघे रा. शिरुड), पसार झालेला चालक, राहुल मास्तर उर्फ राहुल अहिरराव (रा. साक्री), गुलाब शिंदे (रा. कावठी), ट्रकचालक सोपान रवींद्र परदेशी (रा.शिरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
या कारवाईत ९५ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सागर काळे, महादेव गुट्टे, प्रवीण पाटील, मुकेश पवार, नितीन दिवसे, अमोल कापसे, दीपक पाटील, नंदू चव्हाण, वसंत वाघ यांनी ही कारवाई केली.
जागेवरच दिले बक्षीस
धुळे तालुका पोलिसांनी कारखान्याचा छडा लावला. त्यामुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलिसांचे कौतुक करत १० हजारांचे बक्षीस जाहीर केले. तसेच जागेवर त्यांनी बक्षिसाची रक्कम दिली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गौरवले.
गुजरात कनेक्शन?
मद्यासाठी गुजरातमधून स्पिरीट येत होते. संशयित गुलाबचे गुजरातमध्ये नेटवर्क आहे. दिनेशवरही अनेक गुन्हे दाखल आहे. गुजरात विधानसभा व जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असताना हा कारखाना बिनधास्त सुरू होता.
नंदुरबारवरून अटक
संशयित राहुल पंडित अहिरराव (रा. नंदुरबार) याला एलसीबीने नंदुरबारवरून अटक केली. साक्री येथील संस्थेच्या नंदुरबार येथील प्राथमिक शाळेत तो कार्यरत आहे. पथकाने सायंकाळी शहर गाठल्यावर त्याला धुळे तालुका पाेलिसांच्या स्वाधीन केले.
जप्त ट्रकमुळे फुटले बिंग
फागणे-बाभूळवाडी रस्त्याने जाणाऱ्या ट्रकमधून (एमएच-४१-एयू-२९२१) बनावट मद्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी हा ट्रक अडवला. या वेळी चालक पसार झाला. या वेळी ट्रकमधील सोपान परदेशीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी मध्यरात्री या कारखान्यावर छापा टाकला.
मास्टर माइंडची कुंडली
दिनू डॉनवर दारू प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहे. त्याच्या अड्ड्यावर कारवाई करताना भाजल्यामुळे पोलिसाचा मृत्यूही झाला होता. गुलाब शिंदेवर गुजरातमध्ये ४ व महाराष्ट्रात २ गुन्हे दाखल आहे. १० वर्षांपासून गुजरात पोलिस त्याच्या मागावर असताना एलसीबीने काही महिन्यांपूर्वी त्याला अटक करून पोलिसांना सोपवले होते. शिक्षक राहुल अहिररराव प्राथमिक शाळेत कार्यरत आहे.
असे तयार होते मद्य
आरओ प्लाँटमधील फिल्टर पाणी एका टाकीत साठवायचे. त्यात स्पिरीट ओतून टीडीएस मीटरने ९० ते ९५ टक्के अचूकता तपासली जायची. विजेच्या मोटारने रसायन अन्य एका टाकीत टाकले जात होते. त्यानंतर मशीनच्या मदतीने बनावट मद्याच्या बाटल्या भरल्या जात होत्या. सर्वात शेवटी बाटलीवर बनावट लेबल लावले जात हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.