आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकारी:कर्जदारांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन सावकाराने काढल्या 2400 नागरिकांच्या नावे मुदत ठेव पावत्या

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारीतून कोट्यवधीची माया जमवणाऱ्या राजेंद्र बंब याच्या पतसंस्थेतील लॉकरमध्ये तब्बल २ हजार ४०० नागरिकांच्या नावे असलेल्या एफडी अर्थात मुदत ठेव पावत्या सापडल्या. कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून राजेंद्र बंब या नागरिकांच्या नावे परस्पर एफडी करत होता. नागरिकांच्या परोक्ष एफडीची रक्कम काढून गंडा घातला जात होता, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस संबंधित पतसंस्थेच्या संचालकांकडेही चौकशी करणार आहे. गेल्या आठवड्यापासून अवैध सावकारीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजेंद्र बंब याचा आणखीन एक पराक्रम उघडकीस आला आहे. तपास यंत्रणेने शहरातील योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत असलेल्या राजेंद्र बंब याच्या लॉकरमधून रोकड, दागिने, विदेशी चलन जप्त केले. तसेच सुमारे २ हजार ४०० नागरिकांच्या नावावर असलेल्या एफडी अर्थात मुदत ठेवीच्या पावत्याही आढळून आल्या. किमान ९ ते जास्तीत जास्त १५ हजार रुपयांच्या एफडीचा त्यात समावेश आहे. त्यापैकी काही नागरिकांच्या नावावर परस्पर राजेंद्र बंब याने एकापेक्षा अधिक एफडी केल्या आहे. त्यापैकी एका नागरिकाच्या नावाने तब्बल २१ एफडी आढळल्या आहे. वर्षभरासाठी या एफडी केल्या जात होत्या. वर्षभरानंतर राजेंद्र बंब स्वत: एफडीचे नूतनीकरण करून गंडा घालत होता. या सर्व प्रकाराबद्दल नागरिक अजूनही अनभिज्ञ आहे. याप्रकरणी आता पतसंस्थेचे संचालक व प्रशासकांची चौकशी होऊ शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले आहे. डीवायएसपी ईश्वर कातकडे, अधिकारी हेमंत बेंडाळे, हर्षवर्धन बहिर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, उपनिबंधक मनोज चौधरी, राजेंद्र वीरकर यांनी कारवाई केली. दागिन्यांची शुद्धता, वजन, मूल्यांकनाचे काम शासनमान्य मूल्यांकनकर्ता प्रणव बहाळकर यांनी केले. राजेंद्र बंब याच्या अवैध सावकारीचे प्रकरण गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते आहे. त्यामुळे पोलिस खोलात जाऊन तपास करत आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र बंब याने किती नागरिकांना व्याजाने पैसे दिले आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल.

हा तर ठोस पुरावा या प्रकरणातील मूळ तक्रारदार जयेश दुसाने यांनी तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहे. याशिवाय अन्य एक तक्रारदार विलास ताकटे यांच्या दुकानाची कागदपत्रेही याच लॉकरमध्ये आढळून आली आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात ही कागदपत्रे महत्त्वाची ठरतील, असा पोलिसांचा विश्वास आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घेत पुढील निर्णय नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर एफडी करण्याचा प्रकार गंभीर आहे. या संदर्भात वेगळा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी पोलिस प्रशासन एफडी संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. दुसरीकडे एफडी काढल्याचा कालावधी व घेतलेली राेकडचा हिशेब केला जाणार आहे.

नाशिक ‘आयकर’ पथक शहरात या संपूर्ण घटनाक्रमानंतर आयकर विभागही अलर्ट झाला आहे. नाशिक येथील आयकर विभागाचे पथक धुळ्यात आले होते. या पथकाने पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेत गुन्हा संदर्भातील माहिती मागितली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...