आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:धुळे शहरात रात्रीही जाणवतात झळा, कारण उष्णता उत्सर्जनाने सात वाजताही जमिनीचे तापमान 47 अंश

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसापासून सूर्यनारायण आग ओकतो आहे. दुपारी घराबाहेर पडणेही कठीण झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. तसेच रात्री आठ वाजेपर्यंत उष्ण झळा जाणवत असतात. जमीनही तापलेली असते. त्याचे शास्रीय कारण सूर्य आकाशात राहण्याचा कालावधी जास्त असल्याने दिवसभर जमीन तापते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होत असल्याने सूर्यास्तानंतरही वातावरण उष्ण असते, असे तज्ज्ञांनी सांगितले. कृषी महाविद्यालयात ज्या ठिकाणी तापमान मोजले जाते. त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता जमिनीचे तापमान ४७ अंशांपर्यंत असल्याचे समोर आले.

हवामान केंद्रात दुपारी साडेतीन वाजता उच्चांकी तापमान नोंद
शहरातील पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयात असलेल्या हवामान केंद्रात ज्या ठिकाणी तापमानाची नोंद होते. त्या ठिकाणी जमिनीत ५ सेंटीमीटर खोल रोवलेल्या तापमापकावर दुपारी ३.३० वाजता ६० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजता जमिनीचे तापमान ४७ अंश सेल्सिअस होते. दुसरीकडे शहरात तीन ठिकाणी रात्री आठ वाजता जमिनीचे तापमान मोजले असता ते ३९ ते ४१.९ अंश असल्याचे दिसून आले.

दिवसभर सूर्याची किरणे थेट पडल्याने जमीन तापते तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशावर गेला आहे. दिवसभराच्या तप्त उन्हामुळे रात्री आठ ते साडेआठ वाजेपर्यंत उष्ण झळा जाणवत असतात. कारण जमिनीचे तापमान रात्री उशीरापर्यंत जास्त असते. दिवसभर सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असल्याने जमीन दिवसभर तापलेली असते.

शहराचे तापमान ४१ अंशावर
शहराचे तापमान गुरुवारी ४१.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. दुपारी बारा वाजेनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. सायंकाळी सहा वाजेनंतर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. मे महिन्यात उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी दिवसभरात किमान ३ लिटरपेक्षा अधिक पाणी पिण्याचा प्यावे.

शहरात रात्री तीन ठिकाणी तीन अंश सेल्सिअसचा फरक
शहरात तीन ठिकाणी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी जमिनीचे तापमान मोजले. त्यानुसार पांझरा नदी किनारी असलेल्या रस्त्याचे तापमान ४१.९ अंश सेल्सिअस असल्याचे आढळून आले. शहरातील मध्यवर्ती भागातील विजय व्यायाम शाळेच्या मैदानाचे तापमान ३९ अंश तर साक्री रोडवरील डांबरी रस्त्याचे तापमान ४१.४ अंश सेल्सिअस होते. जमिनीच्या तुलनेत डांबरी रस्ते लवकर तापतात. त्यामुळे रस्त्याचे तापमान जास्त अाढळले. दुसरीकडे ज्या भागात झाडे होती त्या भागातील जमिनीचे तापमान इतर भागाच्या तुलनेत सायंकाळी कमी असल्याचे आढळून आले.

उत्तर महाराष्ट्रात लाट, बुधवारपर्यंत खबरदारी घ्या
काही दिवसापासून तापमान वाढले आहे. उन्हाळ्यात सूर्य आकाशात राहण्याचा कालावधी जास्त असल्याने दिवसभर जमीन तापते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होत असल्याने सूर्यास्तानंतरही वातावरण उष्ण असते. उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून पुढील बुधवारपर्यंत (दि.११) तापमान वाढेल. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
डॉ.रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...