आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील मेलाणे येथील विहिरींच्या पाण्याच्या प्रदुषणा संदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त बुधवारी प्रसिध्द केले. त्याची दखल घेत बुधवारी शिंदखेडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेंद्र देसले तसेच बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात भेट देत पाहणी केली. तसेच जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने घेतले. मात्र या यंत्रणेने फक्त सार्वजनिक पाणीपुरवठांच्या जलस्त्रोतांचेच नमुने घेतले आहेत. प्रकरण गंभीर असताना याकडे अद्याप महसूल यंत्रणेने मात्र दुर्लक्ष केले आहे. शिंदखेडा तालुक्यातील मेलाणे आणि वारुळ शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाण्यात रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने रंग बदलला आहे.
या गावातील वास्तव परिस्थिती ‘दिव्य मराठी’ने उजेळात आणली. याची दखल घेत शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेंद्र देसले यांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची पाहणी केली. तसेच आराेग्य विभागाच्या पथकाने देखील जलस्त्रोतांचे नमुने घेतले आहेत. या शिवाय गुलझार नदीचे पाणी ज्या ठिकाणी प्रदूषित झाले आहे. त्या ठिकाणी देखील चाैकशी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी सरपंच राजाराम बोरसे, पोलिस पाटील ब्रिजेश बोरसे, शेतकरी भागवत पवार, शालिग्राम पाटील, संदीप बोरसे, नारायण पवार आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जलस्त्रोताची देखील पाहणी केली.
महसूलयंत्रणा ढिम्म
शेतशिवारातील पाणी प्रदुषित झालेले आहे. या संदर्भात पोलिस पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरुन पंचनामा करून पंचनामा अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. मात्र त्या पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. अद्याप तरी महसूल यंत्रणा ढिम्मच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत दिलासा मिळालेला नाही.
प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष
मेलाणेचे सरपंच राजाराम बोरसे यांनी आणि गावकऱ्यांनी या पूर्वीच धुळे शहरातील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून कैफियत मांडली आहे. मात्र यानंतर मोठा कालावधी उलटला आहे. पाण्याचे प्रदूषण झालेले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.