आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे देवपुरातील अनेक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली. अनेक भागातील रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना चिखल तुडवत घर गाठावे लागते. ग्रामीण भागातील रस्त्यापेक्षाही शहरातील काही रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. शहरात दोन दिवस चांगला पाऊस झाला. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तुंबलेल्या गटारींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुसरीकडे देवपुरातील अनेक वसाहतीतील रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांवर चिखल झाला आहे. चिखल तुडवत नागरिकांना घर गाठावे लागते. काहींना अन्य ठिकाणी मोटारसायकल, चारचाकी वाहन लावून घरी जावे लागते. दरवर्षी ही स्थिती निर्माण होते; परंतु महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही. प्रत्येक वेळा थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येऊन वेळ मारून नेली जाते.
या वसाहतीत रस्त्यावरून चालणेही झाले कठीण
शहरातील वलवाडी परिसरातील दीपमालानगर, पीतांबरनगर, वडेल रस्ता परिसर, वानखेडेनगर, शिवनेरी कॉलनी, नकाणेरोडलगत असलेल्या परिसरातील किशोर अप्पाचा मळा भाग, श्रीनाथ नगर, चंद्रवेल सोसायटी भाग, सुनयना सोसायटी, नगावबारी महामार्गावरील वळण रस्ता परिसरातील वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच जीटीपी स्टॉप ते आरटीओ कॉलनीपर्यंतचा रस्ताही खराब झाला आहे.
तक्रारीनंतर केली प्रभाग चौदात पाहणी
शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील चाळीसगाव रोडवरील पश्चिम हुडकोतील राजे शिव कॉलनीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर सोमवारी नगरसेविका कल्याणी अंपळकर, नगरसेवक युवराज पाटील यांनी या परिसरात पाहणी केली. या वेळी त्यांनी दहा ते पंधरा दिवसांत भूमिगत गटारी व रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले.
गटार स्वच्छतेसाठी १०० कर्मचारी : महापालिका प्रशासनातर्फे तुंबलेल्या गटारींची स्वच्छता सुरू करण्यात आली. या कामासाठी १० झोन करून १०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन दिवसांत ८६ मिमी पाऊस : शहरात शनिवार व रविवारी दोन दिवस मिळून ८६ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात शनिवारी ६८ मिलिमीटर पाऊस झाला होता. पावसामुळे गारठा निर्माण झाला आहे.
मुरूम टाकला जाणार
काही भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात हद्दवाढीच्या क्षेत्रातील रस्त्यांचा समावेश आहे. तक्रारी प्राप्त झाल्यास रस्त्यांची पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.
-देविदास टेकाळे, आयुक्त मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.