आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका होत होती. परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघाने समाज एकसंध करण्याचे काम उभे केले. त्यामुळे आज मात्र संघाच्या याच कामाची दखल घेत संघाला विरोध करणे कमी झाले आहे. असे प्रतिपादन संघाचे माजी सरकार्यवाह तथा संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी येथील स्नेह मेळाव्यात बोलताना केले. व्यासपीठावर काही राजकारणी संघाचा विरोध करत असले तरी खासगीत मात्र ते संघ कार्याची प्रशंसा करतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
पूर्वीच्या एकत्रित धुळे जिल्ह्यातील पूर्व प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवकांचा स्नेह मेळावा येथील सौभाग्य मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यास आतापर्यंत संघाच्या विविध क्षेत्रात पूर्णवेळ काम केलेले प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित हाेते. या स्नेहमेळाव्याच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना भय्याजी पुढे म्हणाले की, जातीय विषमता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण, देशभक्ती, आदर्श नागरिक अशा विविध पातळ्यांवर गेल्या ९७ वर्षांपासून संघाचे काम सुरू आहे. समाजात परिवर्तन आणण्यासाठी संघ काम करतो. हिंदू समाज जाती-जातीत विखुरलेला असल्याने अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. जगात कुठेही नसलेली कुटुंब व्यवस्था ही भारताची विशेषतः असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांचा एकप्रकारे कुंभमेळा ठरलेल्या या कार्यक्रमाची ही वारी करण्यासाठी राज्यभरातून संघाच्या विविध क्षेत्रात पूर्णवेळ काम केलेले आजी, माजी प्रचारक, स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. संघाचे जिल्हा संघचालक गुलाबसिंग वसावे आदी उपस्थित होते.
आधुनिकतेच्या नावाने पश्चिमीकरण सुरू २०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष असून स्वयंसेवकांनी पुढील दोन वर्षे संघाच्या कामासाठी बाहेर पडावे, असे आवाहनही भय्याजी जाेशी यांनी यावेळी केले. संघकार्य हे ईश्वरीय कार्य असल्याने हिंदू समाज शक्तिशाली होण्यासाठी जाती, प्रांत, भाषा असे सारे भेद विसरून स्वयंसेवक संघकार्य करतो, असे सांगून समारोपाच्या सत्रात भय्याजी जोशी यांनी आधुनिकतेच्या नावाने पश्चिमिकरण सुरु असल्याबद्दल खंत व्यक्त केली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.