आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रावेर एमआयडीसीसाठी लागणारी जागा 61 वर्षांपूर्वीच महसूलकडे वर्ग

गणेश सूर्यवंशी | धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळच असलेल्या रावेर परिसरात एमआयडीसीचा विस्तार प्रस्तावित आहे. त्यासाठी रावेर येथील जमीन एमआयडीसीला वर्ग करण्यासाठी मंत्रालयातून हालचाली सुरू आहे. वन विभागाच्या ज्या जागेची मागणी एमआयडीसीसाठी केली जाते आहे ती ८५० हेक्टर जागा व्यापारी अन् मंत्रालयाच्या प्रयत्नापूर्वीच सुमारे ६१ वर्षापूर्वी वन विभागाने महसूल विभागाला वर्ग केली आहे. त्यामुळे आता ही जागा मिळवण्यासाठी वन विभागाऐवजी महसूल विभागाकडे पाठपुरावा करावा लागेल.

शहरापासून १० किलोमीटर
अवधान येथील एमआयडीचा वाढता विस्तार लक्षात घेऊन रावेर क्षेत्रातील वनविभागाची जमीन एमआयडीसीला द्यावी अशी मागणी होते आहे. शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर रावेर परिसर आहे. उद्योगमंत्री उदय सामंत २७ ऑगस्टला जिल्हा दौऱ्यावर आले हाेते. त्या वेळी त्यांच्याकडे उद्योजकांनी या जागेची मागणी केली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी पाठपुरावा सुरू केला. रावेर परिसरातील जागा मिळवण्यासाठी एमआयडीसी, उद्योजकांचा शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

ब्रिटिशांनी १२८ वर्षांपूर्वी दिली होती वन विभागाला
ज्या जागेची मागणी होते आहेे ती ८५०.८६१ हेक्टर जागा ६१ वर्षापूर्वीच वन विभागाने महसूल विभागाला वर्ग केली आहे. ब्रिटिशांनी १२८ वर्षापूर्वी ही जागा वन विभागाला दिली होती. त्यात गट क्रमांक ४१ मधील ३५६.३५९ हेक्टर, गट क्रमांक ७ मधील १८६.२५९ हेक्टर व गट क्रमांक ४० मधील ८.२४ हेक्टर अशा एकुण ८५०.८६१ हेक्टर जागेचा समावेश आहे. महसूल विभागाने शासनाच्या आदेशानुसार काही सोसायटींना हे क्षेत्र दिले आहे. त्यातील काही क्षेत्र बखळ स्वरुपात आहे.

कधी दिली जागा : या जागेपैकी काही जागा ब्रिटिशांनी १४ सप्टेंबर १८९४ मध्ये व त्यानंतर ६ मार्च १८९९ मध्ये असे दोन टप्प्यात ८५० हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात दिले होते.

मालकी ६७ वर्ष : सुमारे ६७ वर्ष हा भुखंड वन विभागाच्या मालकीचा होता. त्यात १८९४ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यत ५३ वर्ष ब्रिटीशांचा काळात तर स्वातंत्र्यानंतर १४ वर्ष १९६१ पर्यतचा समावेश आहे.

१९६१ व १९६९ला ही जागा हस्तांतरीत
जुन्या नोंदीनुसार १८ जुलै १९६१ मध्ये गट क्रमांक ४१ व ७ मधील ६५६.३५९ व १८६.२५९ हेक्टर व २७ सप्टेंबर १९६९ मध्ये गट क्रमांक ४० मधील ८.२४ हेक्टर क्षेत्र महसूल विभागाला हस्तांतरीत झाले आहे. वन विभागाच्या नोंदवही, उताऱ्यामध्ये वन विभागाकडे क्षेत्र शिल्लक नाही असे नमूद आहे.

महसूल विभागाकडे जागा वर्ग
वन विभागाचे रेकॉर्ड तपासले. हे क्षेत्र वनविभागाने महसूल विभागाकडे वर्ग केल्याची नोंद आहे. सन १९६७ व १९६९ या दोन वर्षात ८५० हेक्टर क्षेत्र वर्ग झाले.-संजय पाटील, सहा. उपवनसंरक्षक

वन विभागाकडून माहिती घेऊ
हे क्षेत्र महसुल विभागाकडे वर्ग झाले असल्यास कामाला गती येईल. वन विभागाकडून याविषयीची माहिती घेण्याच्या सूचना यंत्रणेला करू.-जलज शर्मा, जिल्हाधिकारी

बातम्या आणखी आहेत...