आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट:खंडित रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली; खांब वाकले, तारा तुटल्याने वीजपुरवठा

तळोदा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. साधारण तासभर वादळी पावसाचे थैमान सुरू होते. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली, घराच्या भिंती कोसळल्या, रस्त्यावर झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब वाकले, कोसळले. तसेच ताराही तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. पाण्याच्या टाक्या हवेत उडून गेल्या. जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने पेरणीसाठी आणलेल्या बियाण्याचेही नुकसान झाले. या वादळामुळे घरे, झाडांसह महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. या अभूतपूर्व वादळाने सर्वत्र हाहाकार उडाला. तालुक्याला सलग तिसऱ्या दिवशी वादळाचा फटका बसला. सातपुड्याच्या दुर्गम भागात अधिक नुकसान झाले आहे. चक्रीवादळाची नाद नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर माहिती घेतली. मात्र चक्री वादळासारखी कोणतीही नोंद नसून वाऱ्याचा वेग अधिक होता, अशी माहिती तहसीलदार वाखारेंनी दिली.

घरावरील पत्रे २-४ कि.मी. पर्यंत उडाली
तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे राणापूर, काकलपूर, शेळवाई, उमरकुवा, रतनपाडा, अंमलपाडा, इच्छागव्हाण आदी गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेगळा एवढा होता की घरावरील पत्रे अक्षरशः २ ते ४ किमी अंतरापर्यंत उडाली आहेत. या पडझडीत दाेन-तीन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने जीवित हानी टळली. वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर सर्व भीती पसरली. लहान बालके रडायला लागली. कोण कुणाला सावरेल अशी स्थिती होती. ‘वोती वोय होई गिंहू एंडा पोनी ना दिख्यो’ अर्थात यापूर्वी असे वादळ व पाऊस आयुष्यात कधी पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया काकलपूर येथील ६५ वर्षीय आदिवासी नागरिकाने व्यक्त केली. असेच मत फत्तूसिंग पाडवी यांच्यासह अनेक जुन्या जाणत्यांनीही व्यक्त केले.

संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान; पंचनामे सुरू
शनिवारी सायंकाळी अचानक वाऱ्याचा वेग वाढून वादळात रूपांतर झाले. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार व शेती उपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. या वादळामुळे अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घरातील पलंगाखाली तसेच सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार गिरीश वाखारे यांनी दिले. त्या अनुषंगाने तलाठी एम.पी. ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह पंचनाम्याचे काम सुरू केले. तत्पूर्वी राणापूर, काकलपूर येथे माजी सभापती लता वळवी, अर्जुन पाडवी, दिनेश वसावे, मिथुन पाडवी, दिवाणजी पाडवी, देवीसिंग पाडवी, नीलेश पाडवी, गोविंद वसावे, विवेकानंद पाडवी, भीमसिंग वळवी यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला.

नुकसानीची आमदार पाडवींकडून पाहणी
दरम्यान तालुक्याचे आमदार राजेश पाडवी व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.शशिकांत वाणी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली व नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांना दिले. दोन वर्षांपासून एकही घर पडझडीची नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नसल्याने त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. तसेच ही भरपाई मिळणार नसल्यास आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन करू, असेही आमदार पाडवींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...