आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान केंद्र:तापमानाच्या अचूक माहितीसाठी 118 स्वयंचलित हवामान केंद्र होणार

अमोल पाटील | धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह जिल्ह्यात स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती घेतली जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात मंडळनिहाय ३९ स्वयंचलित हवामान केंद्र आहे. पण विविध भागातील बदलते वातावरण आणि पावसाच्या परिस्थितीचा विचार करून हवामान केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील १० हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १९८ स्वयंचलित हवामान केंद्र होतील.

जिल्ह्यात मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र आहे. या केंद्रातून त्या भागातील पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आदी माहिती प्राप्त होते. या माहितीच्या आधारे पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. तसेच कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन केले जाते. पण हवामान केंद्राची संख्या कमी आहे. हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक होते. त्यामुळे शासनाने राज्यात १० हजार स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीला मंजुरी दिली आहे. केंद्र सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा द्यावी असे पत्र कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सुरू केले जाईल.

किती लागणार जागा
हवामान केंद्रासाठी ५ मीटर बाय ७ मीटर जागा लागेल. जागेच्या जवळपास मोठा जलाशय, उष्णता स्रोत, दलदल, पाणथळ व उच्च दाबाची वीजवाहिनी नसावी. तसेच इमारतीजवळ मोठी झाडे अथवा इमारत असू नये. वाऱ्याची दिशा आणि वेग मोजणारा सेन्सर जमिनीपासून तीन मीटर उंचीवर असावा. सभोवताली इमारत असल्यास उंचीच्या १० पट अंतरावर सेन्सर उभारण्यात येईल.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक केंद्र
जिल्हानिहाय होणारे हवामान केंद्र : सातारा ५२६, पुणे ५०६, नाशिक ४९६, अहमदनगर ४६९, नांदेड ४६९, यवतमाळ ४३२, जळगाव ४१२, कोल्हापूर ३६८, सोलापूर ३६७, बीड ३६७, औरंगाबाद ३११, अमरावती ३०४, बुलडाणा ३१२, रत्नागिरी ३०२, चंद्रपूर ३०१, रायगड २९१, सांगली २५१, नागपूर २८०, नंदुरबार २०८, उस्मानाबाद २२३, हिंगोली २०२, जालना २७९, लातूर २८२, अकोला १९३, भंडारा १९५, धुळे १९८, गडचिरोली १६६, गोंदिया १९८, पालघर १७०, परभणी २५२, सिंधुदुर्ग १५६, ठाणे १५५, वर्धा १८६, वाशीम १७६.

जिल्हा परिषदेची मंजुरी
प्रत्येक गावात कमी, अधिक प्रमाणात पाऊस होतो. स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक गावातील पावसाची अचूक माहिती मिळत नाही. नवीन हवामान केंद्र झाल्यावर ही समस्या दूर होईल. जिल्ह्यात १९८ हवामान केंद्र होणार असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या कामाला मंजुरी दिली आहे.
उज्ज्वलसिंग गिरासे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

बातम्या आणखी आहेत...