आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी सैनिक कल्याण निधीला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कार्यालयाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी केले होते. त्यानुसार सर्वाेपचार रुग्णालयातर्फे सैनिक कल्याण निधीला साडेतीन लाखांचा निधी देण्यात आला. हा निधी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि हवाई दलात कार्यरत सैनिक प्राणाची आहुती देत आहे. सैनिक सेवानिवृत्त होतात. त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्यासाठी सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ध्वज निधी देशभर संकलित केला जातो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ध्वज निधीसाठी मदत करावी. या निधीतून युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर होईल. सैनिक कल्याण निधीसाठी अधिकारी व तत्सम पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी १ हजार २०० रुपये, द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी आठशे रुपये, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये द्यावे. संकलित निधी रोखीने किंवा धनादेशाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
तंत्रनिकेतनतर्फे ६४ हजार
सर्वोपचार रुग्णालयातर्फे सैनिक कल्याण निधीसाठी ३ लाख ५४ हजार १०० रुपयांची मदत करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. ए.पी. मोरे यांनी मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोपवला. तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातर्फे ६४ हजार २०० रुपयांचा मदतनिधी प्राचार्य डॉ. वाडेकर यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना सुपुर्द केला. या वेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते. दरम्यान, सैनिक कल्याण निधीसाठी दिलेले उद्दिष्ट दरवर्षी जिल्ह्यात पूर्ण केले जाते, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.