आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवे स्वप्न पूर्ण:वाडी शेवाडी धरणाच्या उजव्या कालव्याने साडेतीन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली; कोरडवाहू जमिनी झाल्या बागायती

कापडणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामी, बोरीस परिसरातून गेलेल्या वाडी शेवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी आल्याने धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची साडेतीन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. शेकडो वर्षांपासून कोरडवाहू असलेल्या जमिनी आता हिरवाईने बहरू लागल्या असून, प्रथमच या कालव्यातून पाणी आल्याने अनेक पाझर तलाव तुडुंब भरली आहेत. आमदार कुणाल पाटील व गटनेते परशुराम देवरे यांच्या प्रयत्नांनी या कालव्याचे काम मार्गी लागले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या उजव्या कालव्यामुळे कोरवडवाहू जमिनी बागायती झाल्या आहेत.

शिंदखेडा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार स्व. द. वा. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी वाडी शेवाडी धरणाची निर्मिती केली. या प्रकल्पात ३६.९३ एमएमक्यू एवढा जलसाठा होऊ शकतो. यात डावा कालवा ७.८ किलोमीटर तर उजवा कालवा १८ किलोमीटर अंतराचा आहे. या धरणाच्या कालव्याचे काम रामी गावापासून पुढे रखडले होते. गटनेते परशुराम देवरे यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी कालव्याचे काम तत्काळ मार्गी लावले. यामुळे उजव्या कालव्याच्या प्रवाहात असणाऱ्या धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेकडो वर्षांपूर्वी असलेल्या कोरडवाहू जमिनी बागायती झाल्या आहेत. हा उजवा कालवा एकूण १८ किलोमीटर अंतराचा असून, या कालव्यामुळे १५ पेक्षा जास्त पाझर तलाव पावसाळ्यापूर्वी तुडुंब भरले असून, विहिरींना चांगले पाणी असल्याने सिंचनास फायदा होणार आहे.

धुळे, शिंदखेडा तालुक्यातील १५ पेक्षा जास्त गावांना लाभ
सन २०१० साली वाडी शेवाडी प्रकल्पाचे काम झाल्यानंतर धुळे व शिंदखेडा तालुक्यातील १५ पेक्षा जास्त गावांना फायदा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकल्प टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा देत आहे. उजव्या कालव्यामुळे मोठा फायदा होत आहे.
भूषण राणे, शाखा अभियंता, सिंचन विभाग

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार
धुळे तालुक्यातील रामी, बोरीस, लामकानीसह दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. बाराही महिने कोरड्या असणाऱ्या जमिनींना आता पाणी मिळाले आहे. या भागातील शेतकरी नेहमी अडचणीत राहत होते. या धरणाच्या उजव्या कालव्यामुळे विहिरींसह सर्व जलस्रोत जिवंत झाल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. परशुराम देवरे, गटनेते बोरीस

बातम्या आणखी आहेत...