आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिंचेची तीन हजार रोपे मोफत वाटपासाठी तयार; पुढील वर्षाचे नियोजनही आत्तापासूनच

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील सुमन फाउंडेशनतर्फे दरवर्षी पावसाळ्यात रोपांचे मोफत वाटप केले जाते. त्यानुसार यंदाही चिंचेच्या ३ हजार रोपांचे वाटप केले जाणार आहे. ही रोप तयार झाली आहे. तसेच पुढील वर्षाच्या वृक्षारोपणाची तयारीही आत्तापासूनच सुरू आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुधारण्यासाठी प्रयत्न होत आहे.

शहरात महापालिकेच्या मोकळ्या जागांसह रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनासह शहरातील विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शहरात हिरवळ वाढण्यास मदत होते आहे. सुमन फाउंडेशनतर्फे दरवर्षी नागरिकांना पावसाळ्यात मोफत रोपांचे वाटप होते. त्यानुसार यंदाही चिंचेच्या रोपांचे वाटप होणार आहे. त्यासाठी जवळपास ३ हजार रोपे तयार झाली आहे. ज्यांना रोप हवी असतील त्यांनी सुमन फाउंडेशन कार्यालयातून दत्त मंदिर चौकाच्यापुढे हॉटेल हिम समोर येथून घेऊन जावी, असे आवाहन फाउंडेशन अध्यक्ष विजय चांडक यांनी केले आहे. सर्व रोप जवळपास एक फूट उंचीची आहे. चिंचेचे रोप कोणत्याही परिस्थितीत तग धरते. तसेच या वृक्षाची सावली चांगली पडते. चिंच विक्रीतून उत्पन्नही मिळते. त्यामुळे ते रोप बहुपयोगी असल्याने नागरिकांनी मोकळया जागेत, रस्त्याच्या कडेला, शाळेच्या आवारात लावावे.

पुढील वर्षी आंब्याची रोप
फाउंडेशनतर्फे पुढील वर्षाच्या वृक्षारोपणासाठी आत्तापासून तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी आंब्याच्या दोन ते तीन हजार रोपांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आंब्याच्या कोयी फाउंडेशनकडे जमा कराव्यात. या कोयीपासून दोन फुटांचे आंब्याचे रोपे तयार करून पुढील वर्षी त्याचे वाटप होईल.

१० वर्षांत २० हजारांवर रोपांचे वाटप
फाउंडेशनतर्फे गेल्या दहा वर्षांत २० ते २५ हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. रोपांसह फाउंडेशनतर्फे संरक्षण पिंजऱ्याचेही वाटप मोफत होते. हा उपक्रम सन २००१ पासून सुरू आहे. एक लाख रोप वाटप करण्याचा संकल्प सुमन फाउंडेशनचा आहे.

असे होते वृक्षांचे वाटप : फाउंडेशनतर्फे दरवर्षी एका व्यक्तीला दोन, शाळा, महाविद्यालयांना प्रत्येकी २५ तर सामाजिक संस्थांना १५० रोपांचे वाटप करण्यात येते, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...