आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटबंदी आजही मजबूत:खान्देशातील अखेरच्या फाशीला आज 75 वर्षे

गणेश सूर्यवंशी | धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थेट सन १८५७च्या उठावाचा इतिहास सांगणाऱ्या धुळे जिल्हा कारागृहाची तटबंदी आजही मजबूत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांना या कारागृहात फासावर चढवण्यात आले. कारागृहातील अखेरच्या फाशीला उद्या रविवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानंतर खान्देशातील एकाही बंदिवानाला या कारागृहात फाशी झालेली नाही.

स्वातंत्र्यानंतरही जिल्हा कारागृहातील फाशी यार्ड शाबूत आहे. त्याला कुलूप लावण्यात आले असून ते कधीही काढलेले नाही. सन १८५७चा उठाव धुळ्यातील कारागृहाच्या बांधणीला कारणीभूत ठरला. शिवाय या उठावाची खान्देशातही ठिणगी पडली. त्यावेळी पूर्व व पश्चिम खान्देश स्वरूपात हा विभाग होता. पण ब्रिटिशांचे लक्ष पश्चिम खान्देश म्हणजे धुळ्यावर होते. सन १८५७ नंतर खान्देशातही उठाव झाला होता.

हे बंड चिरडण्यासाठी सन १८६२ मध्ये धुळ्यात बाराकोनी कारागृह बांधण्यात आले. सन १९०२ मध्ये नवीन बराकी बांधण्यात आल्या. त्यासाठी १२ हजार २०० रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. उठावानंतर या कारागृहात अनेकांना फाशी देण्यात आली. त्यांची नावे अन इतिहास अद्यापही पडद्याआड आहे. त्यावेळी अवघ्या २२ रुपयांत फाशी यार्ड अर्थात फाशीस्तंभ बांधण्यात आल्याची नोंद शासनाकडे आहे. या फाशी यार्डमध्ये अनेकांना फाशी झाली. कारागृहात अखेरच्या फाशीला उद्या ४ सप्टेंबरला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबर १९४८ रोजी एका बंदिवानाला फाशी देण्यात आली होती. स्वातंत्र भारतातील ती पहिली फाशी होती. त्यानंतर या फाशी यार्डला लावलेले कुलूप कधीच काढण्यात आले नाही, असे जाणकार सांगतात.

असा आहे फाशी यार्ड
सुमारे १५ बाय ७ आकारातील मोठी खोलीत एक फूट रुंद व दोन दगडी भिंतीत रोवलेला सागवानी लाकडाचा फाशी स्तंभ आहे. त्याचा हूक अजूनही शाबूत आहे. फास दिल्यानंतर ओढण्यात येणारा खटका, पाया खालून लागलीच सरकणारा जाड सागवानी दरवाजा, त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या लांब लोखंडी कड्या सर्व काही तसेच आहे. या खोलीच्या खाली सुमारे १२ फूट खोल अन्य एक खोली आहे. तिच्या तळाशी लांबट चौकानी हौदात मृतदेह उतरवला जात होता.

कोणाला झाली फाशी
जेल मॅन्युअल अर्थात कारागृह संहितेनुसार फाशी झालेल्या व्यक्तीचे नाव सांगितले जात नाही. या बंदिवानावर ३०२, ३९५ नुसार खून व लुटीचा गुन्हा दाखल होता. न्यायालयाने त्याला फाशी ठोठावल्यानंंतर नियमानुसार त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले होते. तसेच फासावर चढवण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना शिक्षेची कल्पना होती.

बातम्या आणखी आहेत...