आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापौर निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ हाेईल. मनपात भाजपचे बहुमत असले तरी कोणताही धोका नको म्हणून उद्या गुरुवारी भाजपचे सर्व नगरसेवक लोणावळा येथे जातील. दरम्यान, महापौरपदासाठी इच्छुक भाजपच्या नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली.
बैठकीला निम्मेपेक्षा अधिक नगरसेवक अनुपस्थित होते. महापौरपदासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी, हर्षकुमार रेलन व वालीबेन मंडोरे यांचे नाव आघाडीवर आहे. महापौरपदावर काम करण्याची संधी इतरांनाही मिळावी यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रदीप कर्पे यांनी महापौरपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला.
त्यानंतर आता ८ फेब्रुवारीला नवीन महापौरांची निवड होणार आहे. मनपात भाजपचे बहुमत असले तरी महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेण्यास प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे कोणताही धोका नको म्हणून अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपचे सर्व नगरसेवक गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये एकत्र जमतील. तेथून ते दुपारी लोणावळ्याला जातील.
पक्ष पातळीवरून ज्या नगरसेवकाचे नाव महापौरपदासाठी निश्चित होईल तो नगरसेवक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येऊन अर्ज भरेल. त्यानंतर ८ फेब्रुवारीला भाजपचे सर्व नगरसेवक मनपात येतील. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जाते आहे. गेल्या वेळीही सर्व नगरसेवकांना दमण येथे नेण्यात आले होते. आताही कोणताही धोका नको म्हणून नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत भाजप करते आहे.
एमआयएमची आज बैठक
महापौरपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनपात भाजपचे बहुमत असले तरी विरोधी पक्ष एमआयएमतर्फे महापौरपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एमआयएमची उद्या गुरुवारी बैठक होणार आहे. बैठकीला पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित असतील. या बैठकीत वरिष्ठांशी चर्चेनंतर निर्णय होणार आहे.
नियोजनासाठी बैठक
भाजप नगरसेवकांची राम पॅलेस येथे बैठक झाली. या वेळी ५० पैकी फक्त २० नगरसेवक हजर हाेते. काही नगरसेवक विवाह सोहळ्याला गेल्याने आले नसल्याची माहिती देण्यात आली. महापौरपदासाठी उमेदवार ठरवताना नगरसेवकांचे मत बैठकीत खुलेआम नोंदवण्यात यावे, त्यानंतर उमेदवार निश्चित करावा, अशी मागणी बैठकीत काही नगरसेवकांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.