आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र ते अरुणाचलदरम्यान १ लाख बीजांचे रोपण केल्यानंतर धुळ्यातील अॅड. सचिन वसंतराव पिंगळे आता भारतातील चार दिशांना २ लाख बियांचे रोपण करण्यासाठी प्रवासाला निघणार आहेत. ‘हॉर्न ओके बीज -२.०’ असे या उपक्रमाचे नाव आहे. १५ हजार किमीच्या प्रवासात कन्याकुमारी-अरुणाचल प्रदेश-लडाख अन् गुजरातमधील शेवटच्या जिल्ह्यापर्यंत रोपण करणार आहेत.
धुळ्यातील मूळ रहिवासी तथा सध्या अलिबाग येथे स्थायिक असलेले अॅड. पिंगळे अलिबाग येथून रविवारी प्रवासाला निघाले आहेत. सर्वप्रथम कन्याकुमारी, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, भारत-चीन सीमेजवळील तेजू या ठिकाणी रोपण करतील. लेह-लडाख तेथून पुन्हा प्रवास करत गुजरातमधील कोटेश्वरपर्यंत आंबा, लिंब, वड, बांबू, चिंच, आवळा, सीताफळ, खैर या वृक्षांच्या २ लाख बियांचे (७० किलो) रोपण केले जाईल.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत उगवणारी ही रोपटी यानंतर आपोआपच तग धरतील या अनुषंगाने तशी निवड केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील अॅड. पिंगळे यांनी कोटेश्वर ते तेजूपर्यंत पश्चिम-पूर्व दिशेने हॉर्न ओके बीजारोपण मोहीम राबवली होती. १६ दिवसांच्या ७ हजार किमीच्या प्रवासात एक लाख बीज जमिनीत टाकले होते. त्याबद्दल अरुणाचल प्रदेशमधील तेजू येथील वन विभागाने त्यांचा गौरव केला होता.
५० दिवसांत २३ राज्यांतून प्रवास
सुमारे १५ हजार किमीचा हा प्रवास कारमधून करणार आहेत. ते देशातील २३ राज्यांना ५० दिवस दिवसात भेट देणार आहेत. ३७ ठिकाणी मुक्कामाचे नियोजन आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश येथून पुन्हा आसाम, पश्चिम बंगालमार्गे बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात राज्यातून प्रवास करणार आहेत. प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बिया टाकतील. पेट्राेल पंप, हॉटेल्स-ढाबा येथील चालकांनाही बिया देणार असून रोपांच्या संगोपनाचे आवाहन करणार आहेत.
उपक्रमासोबत प्रबोधन
पर्यावरणात वृक्षांचे महत्त्व अधिक आहे. निसर्गसंपदा अबाधित राहिली तरच मानवी जीवन सुखद बनेल याच हेतूने मोहीम हाती घेतली आहे. शिवाय कोरोनामुळे ऑक्सिजन व पर्यायाने झाडांचे महत्त्व याबद्दलही उपक्रमातून जागृती करणार आहे. अॅड. सचिन पिंगळे, पर्यावरणप्रेमी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.