आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यानंतर आता या दोन्ही तालुक्याला शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. दोन्ही तालुक्यात सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावरील पीक आडवे झाले. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी गावात वीज पडल्याने दोन तर शिरपूर तालुक्यात एक बैल ठार झाला. दोन्ही तालुक्यात सुमारे ६० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्यातील काही भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. शिरपूर शहरासह तालुक्यातील सांगवी, होळनांथे येथे वादळी पावसाने एक तास हजेरी लावली़.
शिरपूर, थाळनेर,अर्थे, बोराडी मंडळातही पाऊस झाला. दहिवद व पळासनेर परिसरात गारा पडल्या. पावसामुळे गहू, हरभरा, केळी, पपईला फटका बसला. शिरपूर तालुक्यात साधारणपणे २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे २० लाखांचे नुकसान झाले. रोहिणी, खंबाळे परिसरातही पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यातील सुकवद, तावखेडा, वर्शी, दभाषी, दत्ताणे, गव्हाणे, सुलवाडे, वरसूस, विरदेल, सोनेवाडी, आकडसे, कमखेडा, हुंबर्डे, वरझडी, सोनशेलू, विखरण, भडणे, मेथी, टेभंलाय, निरगुडी, चिलाणे आदी भागात पाऊस झाला. तालुक्यात २०० हेक्टरवरील मका, १५० हेक्टरवरील गहु, ५० हेक्टरवरील हरभरा, दादर व कांद्याचे नुकसान झाले.
कृषी, महसूल यंत्रणेचे कर्मचारी फिरकले नाही
रविवारी सुटी असल्याने नुकसानग्रस्त भागाकडे महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी फिरकले नाही. पुढील दोन दिवस होळी व धूलिवंदनाची सुटी असल्याने गुरुवारनंतर पंचनामे होण्याची शक्यता आहे. शिंदखेडा तालुक्यात साधारण २०० ते २५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
शहरातही पहाटे शिडकावा
शहरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून रविवारी पहाटे व सकाळी दोन ते तीन वेळा अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण व उन्ह, सावलीचा खेळ सुरू होता. शहरात रविवारी कमाल तापमान ३७ अंश तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसभर उकाडा जाणवत होता.
शिरपूरला ४० मिमी पाऊस
शिरपूर तालुक्यात ४० मिलिमीटर पाऊस झाला. त्यात शिरपूर मंडळात १६ मिलिमीटर, थाळनेर मंडळात ३ मिमी, अर्थे मंडळात १६ मिमी, बोराडी मंडळात ५ मिमी तर होळनांथे मंडळात ५ मिमी पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यातील विखरण मंडळात ११ मिमी तर शेवाळे मंडळात २ मिमी पाऊस झाला.
तीन बैलांचा झाला मृत्यू
शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली. सांगवी शिवारात लक्ष्मीबाई खंडू गायकवाड-कोकणी यांच्या शेतातील झाडाजवळ बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील शेतकरी चिंता पंडित माळी यांच्या शेतात बांधलेल्या बैलजोडीवर वीज ७५ हजारांच्या बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.