आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युदाे:कोल्हापूरच्या ओमचा पुण्याच्या शौर्यवर विजय

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुनीत बालन प्रस्तुत आणि महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या वतीने आयोजित ४९ वी राज्यस्तरीय सबज्युनियर्स आणि कॅडेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस कोल्हापूरच्या ओम पाटील, मुंबईचा ऋतिक गुप्ता आणि सांगलीच्या दक्षा नाईक यांनी गाजवला. आज स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत ५० किलोखालील गटात पुण्याच्या शौर्य बिचुकलेने चपळाईने पाहिल्याच मिनिटात सीओई नागे या डावाचा वापर करून अर्धा गुण घेतला आणि सामन्यावर पकड घेतली. पण लगेचच कोल्हापूरच्या ओमने आक्रमक खेळी करून अर्धा गुण घेतला. दोघांचे समान गुण झाले आणि सामन्याची चुरस वाढली. स्पर्धेचा तीन मिनिटांचा वेळ संपल्यामुळे सामना गोल्डन स्कोअरवर गेला आणि स्पर्धकांना वाढीव वेळ मिळाला. साधारणपणे नवव्या मिनिटावेळी ओम पाटील यांनी हराई गोषी या डावाचा सुरेख वापर केला आणि इप्पोन हा पूर्ण गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या ५५ किलोखालील वजनी गटाच्या सामन्यात मुंबईच्या ऋतिक गुप्ताने नाशिकच्या वेदांत अहिरेला ओउची माकेकोमी डावाचा सफाईदार वापर करून पूर्ण इप्पोन गुणाने पराभूत केले आणि सुवर्णपदक जिंकले. ४८ किलोखालील सबज्युनियर्स मुलींच्या अंतिम सामन्यात सांगलीच्या दक्षा नाईकने यवतमाळच्या श्रावणी डिकेला ओगोषी डाव मारला आणि विजेतेपद मिळवले. हादेखील सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि गोल्डन स्कोअरवर गेलेल्या लढतीला दक्षाने पूर्णविराम दिला. स्पर्धेसाठी स्पोर्ट‌्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच सुशीलकुमार गायकवाड यांची स्पर्धा संचालकपदी तर मॅट चेअरमन म्हणून अतुल बामनोदकर (औरंगाबाद), निखिल सुवर्ण (ठाणे) आणि सचिन देवळे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे ६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. २७ जिल्ह्यांतील ५०५ खेळाडू ४० पंच आणि ७० प्रशिक्षक तसेच व्यवस्थापक धुळे शहरात दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...