आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिम्मा जून महिना उलटला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील काही गावे तहानली आहे. सद्य:स्थितीत दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. तसेच ९१ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाने सरासरी ओलांडल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे काठोकाठ भरले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत जिल्हा पाणीटंचाईच्या झळापासून लांब होता. इतकेच नव्हेतर दोन वर्षांत जिल्ह्याची टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण झाली. अतिपावसामुळे ओला दुष्काळही जिल्ह्याने अनुभवला आहे. यंदा, मात्र पावसाने जिल्हावासीयांची निराशा केली आहे. ७ जूनपासून पावसाळा सुरू झाला. रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यानंतर ८ जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात झाली आहे. या नक्षत्रात एक ते दोन पाऊस झाला.
त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. आता निम्मा जून महिना संपुष्टात आला तरीही पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही गावे तहानली आहे. शंभरावर गावांना सद्य:स्थितीत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. येत्या आठवड्यात चांगला पाऊस झाला नाहीतर टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.
शिरपूर तालुक्यातून विहीर अधिग्रहणाचे तीन प्रस्ताव
शिरपूर तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे झाली आहेत. तालुक्यात शिरपूर पॅटर्नअंतर्गत अनेक बंधारे बांधली आहेत. त्यानंतरही यावर्षी शिरपूर तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात सद्य:स्थितीत एका गावासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. तसेच आणखी तीन गावांसाठी विहिरी अधिग्रहित करावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहे. हे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले आहे.
साक्रीत सर्वाधिक विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात
जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीटंचाईची झळ साक्री तालुक्याला अधिक बसली आहे. साक्री तालुक्यात तब्बल ६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या तालुक्यात २४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. धुळे तालुक्यातील पाच आणि शिरपूर तालुक्यातील एका गावासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तांडा कुंडाणे व मडगावला टँकरने होतोय पाणीपुरवठा
जिल्ह्यातील दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. त्यात धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे गावाचा सामावेश आहे. या गावात टँकरने पाणीपुरवठा होत असून, टँकर भरण्यासाठी प्रशासनाकडून विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच साक्री तालुक्यातील डोमकानीपैकी मडगाव येथे टँकरने पाणीपुरवठा होतो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.