आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी त्यांच्या हक्काविषयी जागृत झाले पाहिजे. त्याचबरोबर अन्याय झाला तर दाद मागण्यासाठी कायद्याची मदत घ्यावी. हे सर्व करत असताना कर्तव्याची जाण ठेवावी, असे मत अॅड. पूनम काकुस्ते यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यातील पेरेजपूर येथे महिला दिनानिमित्त महिला विषयक कायदे जनजागृती मेळावा झाला.
त्या वेळी त्या बोलत होत्या. साक्री न्यायालयाचे न्या. के. टी. अढायके अध्यक्षस्थानी हाेते. न्या. नीलेश पाटील, साक्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वाय. पी. कासार, अॅड. एस. जे. पाटील, अॅड. बादल साळुंखे, अॅड. करुणा गावित, अॅड. रूपाली देसले, अॅड. चंद्रकला देवरे, साक्री न्यायालयाचे अधीक्षक गायकवाड, विवेक सोनवणे, महिला बचत गटाच्या तालुका समन्वयक सुमन भदाणे आदी उपस्थित होते. अॅड. पूनम काकुस्ते-शिंदे यांनी राज्यघटनेने महिलांना दिलेले विविध अधिकार, राष्ट्रीय महिला आयोग, पोटगीचा कायदा, कौटुंबिक कायदा, घटस्फोटाचा कायदा, महिलांचे राजकीय, सामाजिक अधिकार व आरक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
या वेळी त्या म्हणाल्या की, महिला पुरुषांपेक्षा शारीरिक बदलामुळे भिन्न असल्या तरी सुद्धा राज्यघटनेने त्यांनाही पुरुषांप्रमाणेच समांतर अधिकार दिले आहे. महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांना शिक्षण घेण्यासह जगण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेद प्रत्येकाने टाळावा. मुलींना उच्च शिक्षण द्यावे. तसेच १८ वर्षांनंतरच तिचा विवाह करावा. बालवयात विवाह करण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच अस्तित्व सिद्ध करावे, असेही अॅड. पूनम काकुस्ते यांनी स्पष्ट केले.
पोटगीच्या कायद्यासह मिळकतीची दिली माहिती
या वेळी अॅड. व्ही. ए. खैरनार यांनी कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. न्या. के. टी. अढायके यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला पोटगीचा कायदा, वडिलोपार्जित मिळकती संदर्भातील कायद्याविषयी माहिती दिली. या वेळी पेरेजपूर ग्रामपंचायतीतर्फे गावातील कर्तव्यदक्ष व विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा न्या. अढायके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अॅड. चारू शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच मनोज देसले यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.