आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत लक्षवेधी:सुलवाडे-जामफळचे पाणी कापडणेसह नगाव परिसरातील 10 गावांना मिळावे

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकल्पबाधितांवर अन्याय होणार नाही : आमदार कुणाल पाटील

सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेतून कापडणे-नगाव परिसरातील १० गावांतील सिंचन क्षेत्राला पाणी द्यावे, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी विधानभवनात लक्षवेधी मांडताना केली होती. त्यानुसार याकरिता पुनर्सर्व्हे करण्याच्या सूचना देऊ व त्यातून जेवढे पाणी उपलब्ध करून देता येईल तेवढे पाणी त्या दहा गावांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे परिसरातील शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देण्याचीही मागणी आमदार पाटील यांनी केली. मोबदला देताना एकाही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे.

आमदार पाटील यांनी धुळे तालुक्यात होणाऱ्या सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून उद्भवणारे प्रश्न आणि मागणीच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली. त्यात तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजवरून सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेला सरकारने गती दिली आहे. योजनेमुळे जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी एकूण २५ कोटी रुपये एवढा खर्च येत आहे. पाइपलाइनद्वारे पाणी देताना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन अतिरिक्त पाणीसाठा वाचणार आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी धुळे तालुक्यातील दापुरा, सरवड, लोणकुटे, कापडणे, धमाणे, धमाणी, नगाव, बिलाडी, कुंडाणे, वरखेडे व बाळापूर या १० गावातील शेती क्षेत्रातील बंधारे व तलाव भरून घेतल्यास शेतकऱ्यांचे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होऊन या भागातील दुष्काळ दूर करण्यास मदत होणार आहे. म्हणून या १० गावांना सुलवडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतून सिंचनासाठी पाणी देण्यासाठी नियोजित प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून १० गावांच्या बंधाऱ्यात पाणी टाकावे, अशी मागणी केली. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेत प्रकल्पबाधित होणारे धुळे तालुक्यातील वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे या गावातील शेती संपादित केली आहे. मात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला जाहीर झाला आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा, फळझाडे, घरे, विहिरी, बोअरवेल, शेड यासह सुटलेल्या विविध मालमत्तेचे नव्याने मूल्यमापन करून वाढीव दर देऊन योग्य तो मोबदला द्यावा, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचा आराखडा बनवताना कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्याचे नियोजित केले होते, मात्र मंजुरी देताना त्यात बदल करून पाइपलाइनमधून पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे काही पाणी शिल्लक असेल आणि जे पाणी वाचेल ते १० गावांना पुरत असेल तर यासाठी पुनर्सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

वाढील मोबदल्याबाबत मार्ग काढणार
वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे येथील शेतकऱ्यांची जमीन या योजनेत संपादित करण्यात आली आहे. मात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून होणारी वाढीव मोबदल्याची मागणी आणि सुटलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्याबाबत पर्याय शोधून विशेष बाब म्हणून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. आमदार कुणाल पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे धुळे तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...