आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनानंतर आली जाग:नवरंगमधून देवपुरात पाणीपुरवठा; 6 ऐवजी 4 दिवसांआड भागेल तहान

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील नवरंग जलकुंभाच्या शेजारी नवा जलकुंभ बंाधला आहे. त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले पण पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता. याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झाल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिकेने नव्या नवरंग जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार काही दिवसांपूर्वी जलकुंभात दोन मीटरपर्यंत पाणी भरले होते. या जलकुंभातून देवपूर, दत्त मंदिर परिसरात नियमित चार दिवसांआड पाणीपुरवठा होईल.

शहरातील विविध भागात चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. देवपुरातील काही भागाला पाणीपुरवठा करणारा जुना नवरंग जलकुंभ जीर्ण झाल्याने तो पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे अनेक वसाहतीत वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी या जलकुंभाच्या शेजारी नवीन जलकुंभ उभारण्यात आला. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले. जलकुंभ उभारून एक वर्ष झाले तरी त्यातून पाणीपुरवठा सुरू झाला नाही. जलकुंभाच्या कामात काही त्रुटी असल्याने महापालिकेने तो ताब्यात घेतला नव्हता. महापालिकेसमोर जलकुंभाची चाचणी झाली नाही.

तसेच मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. हे कामही रखडले होते. त्यामुळे नागरिक व नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यानंतर महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्य जलवाहिनी दुरुस्ती केली. जलकुंभाजवळ वाढलेली काटेरी झुडप तोडली. लेव्हल पट्टी बसवली. तसेच मनपा व मजीप्रा अभियंत्यांच्या उपस्थितीत जलकुंभात पाणी भरण्यात आले. चाचणीनंतर या जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी वितरण करताना काय अडचणी येतात याची तपासणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

संरक्षण भिंत बांधणार, वॉचमन नेमणार
नवरंग जलकुंभ तापी पाणीपुरवठा योजनेवरून भरण्यात येतो. या जलकुंभावरून देवपूरसह दत्त मंदिर परिसरातील ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. नवीन जलकुंभ सुरू झाल्याने भागात नियमित पाणी मिळेल. दरम्यान, जलकुंभाला संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून वॉचमनची नियुक्ती केली जाणार आहे.

या भागाला मिळेल दिलासा
नवीन नवरंग जलकुंभ ७ मीटर उंच आहे. त्यातून देवपूरचा काही भाग, लाला सरदारनगर, नूरनगर, मोहंमदीनगर, विटाभट्टी, देवीरोड, ६० खोली, भाई मदाने नगर, शिवपार्वती कॉलनी, जिल्हा परिषद सोसायटी, ऑडिटर काॅलनी, सिंघलनगर, सदाशिव नगर, श्रीरामनगर, स्वामिनारायण सोसायटी, दत्त कॉलनी, प्रभातनगर,सैनिक कॉलनी, विद्यानगर, भगतसिंगनगर आदी भागात पाणीपुरवठा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...