आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातून दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर आवर्तन सोडण्याची मागणी होते. यंदाही काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली असून काही गावांना टंचाई जाणवते आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी करता आहे. दुसरीकडे बिगर सिंचन पाणीपट्टी भरण्यासाठी दरवर्षी टाळाटाळ होते.
आता पाटबंधारे विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला थकीत ८ कोटी २० लाख १७ हजार रूपये पाणीपट्टी भरण्यासाठी पत्र पाठवले आहे. ही रक्कम जिल्ह्यातील १६६ गावांकडून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींना पत्र देत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात पिण्यासाठी पाणी आरक्षित असते. आरक्षित पाणी गरज व मागणीनुसार सोडण्यात येते. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून बिगर सिंचन पाणीपट्टीची आकारणी करण्यात येते. ही पाणीपट्टी पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वसूल करतो. जिल्हा परिषदेने ही पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडून वसूल करुन पाटबंधारे विभागाकडे जमा करावयाची असते.
मात्र, दरवर्षी ग्रामपंचायतींना फक्त पाणी हवे असते पाणीपट्टी जमा करण्याची ग्रामपंचायतींची इच्छा नसते. त्यामुळे प्रकल्पातून आवर्तन सोडताना अडचणी निर्माण होतात. काही दिवसापासून मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होते आहे. पण पाणी सोडण्यापूर्वी बिगर सिंचन पाणीपट्टी भरावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला केली आहे. बिगर सिंचन पाणीपट्टी पोटी जिल्हा परिषदेकडे ८ कोटी २० लाख १७ हजार रूपये थकले आहे.
जोपर्यंत पाणीपट्टीच्या किमान पन्नास टक्के रकमेचा भरणा होत नाही. तोपर्यंत मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदी काठावरील लाभार्थी गावांना पाणीपट्टी भरण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.