आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सकाळी अकरा वाजेपासून आत उन्हाचे चटके बसायला लागल्याने मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारावरदेखील मोठा परिणाम झाला. मुख्य रस्त्यांवर उन्हामुळे अक्षरशः वर्दळ कमी होती. जनसामान्य जीवनावर तापमानाचा गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत नागरिक आपली कामे आटोपण्याच्या प्रयत्न करीत असतात. बाजारात खरेदी करून घरी परततात. एवढा परिणाम तापमानाचा झाला आहे. साधारणतः २० एप्रिलपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. १० मे रोजी नंदुरबार जिल्ह्याचे तापमान ४५.८ पर्यंत पोहोचले होते. अतिउष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवार आठवडे बाजार असतानादेखील नगरपालिका परिसर, मेनरोड, चार रस्ता, काशिनाथ मार्केट, पुरुषोत्तम मार्केट, भाजी मार्केट, भागात वर्दळ नव्हती. आठवडे बाजार असल्याने जनता चौक भागात विक्रेत्यांची दुकाने कमी दिसून आली. शहरातील नागरिक दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरीच राहणे पसंत करीत आहेत. सर्वाधिक वर्दळ असलेल्या बसस्थानक परिसर शुकशुकाट दिसत होता. ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या शहरी भागात कमी झाली आहे. बसस्थानक परिसरात उन्हामुळे प्रवाशांची गर्दीदेखील कमी झालेली दिसून आली. शहरातील शासकीय कार्यालयांमध्येदेखील दुपारी शुकशुकाट दिसतो.
वरमिरवणुकीतूनही काढता पाय
नवरदेवच्या मिरवणुकीत नाचणाऱ्यांची संख्या दिसत नाही. उन्हामुळे वधू-वर दोन्हीकडे नातेवाईक मित्रपरिवार सरळ लग्नाच्या मंडपात जाऊन बसलेले दिसतात. मंगल कार्यालयांमध्ये जाऊन थांबत असतात. जिल्ह्यात पहिल्यांदा तापमानाने उच्चांक गाठला आहे परिणामी जनता हवालदिल झाली आहे. जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे.
पपई, केळी, वाचवण्यासाठी धडपड
अति तापमानामुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. शेतकरी बागायती पिके पपई, केळी, वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. छोट्या रोपट्यांना प्लास्टिकच्या पिशव्या झाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर लागलेल्या पपया वाचवण्यासाठी प्लास्टिकच्या गोणपाटच्या पिशव्या बांधून संरक्षण दिले जात आहे. मजूरदेखील सकाळी लवकर शेतांमध्ये कामाला जातात. जास्त उन्हामुळे दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत झाडांच्या सावलीच्या आश्रय घेऊन आराम करताना दिसतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.