आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थी बनले उद्योजक

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर येथे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांनी रायनोसा नावाने ई-बायसिकलचे मॉडेल तयार केले. फक्त मॉडेल विकसित करून हे विद्यार्थी थांबले नाही तर त्यांनी या सायकलचे पेटंट मिळवले. स्वत:ची एमडब्ल्यू कंपनी स्थापन केली. आता याच कंपनीच्या माध्यमातून पाचही विद्यार्थ्यांनी त्यांची इलेक्ट्रिक सायकल विक्रीसाठी आणली आहे. मॅकेनिकल शाखेची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसमोर शिरपूरच्या तरुणांचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे.

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. ही स्थिती शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत अंतिम वर्षाचे विद्यार्थी तेजस अनिल पवार, गौरव प्रदीपराव बोरसे, यशकुमार युवराज पाटील, योगेश्वर सुनील चौधरी, नचिकेत विजय पाटील यांनी जवळून बघितली होती. या स्थितीतही त्यांना नामांकित कंपनीत चांगल्या प्लेसमेंटची संधी होती. पण त्यांनी ज्ञानाचा वापर करून स्वतःचा रोजगार उभा करून उद्योजक होण्याचे ठरवले.

एमडब्ल्यू सोल्युशन्स नावाने कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून अन्य विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यासाठी मदत करणे, त्यांना अल्प दरात साहित्य पुरवणे, तांत्रिक प्रश्न सोडवणे, विविध कंपन्यांना तांत्रिक विश्लेषण करून देणे आदी कामे सुरू केली. त्यानंतर पाचही विद्यार्थ्यांनी पेट्रोल व डिझेलचे वाढते दर लक्षात घेत इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचे ठरवले. सद्य:स्थितीत बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक सायकलची किंमत जास्त असल्याने ही सायकल घेणे परवडत नाही. त्यामुळे पाचही विद्यार्थ्यांनी कमी किमतीतील रायनोसा ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली. या सायकलचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजगोपाल भंडारी, मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे माजी कुलपती जफर सरेषवाला, डॉ.जे. बी. पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. विद्यार्थ्यांना प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. एन. एम. शिंदे, प्रा. पी. डी. जमादार व प्रा. के. डी. देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

पायडलवर बॅटरी होणार चार्जिंग
रायनोसा ही ई-सायकलमध्ये २० एएच लिथियम आयन बॅटरी आहे. त्यामुळे सायकल थ्रेाल मोडवर ९० किमी पेक्षा जास्त अंतर चालते. एकादा चार्जिंग केल्यावर ४५ ते ९० किमी अंतर सायकल चालते. सायकलमध्ये जनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. पायडल मारताना सायकलची बॅटरी चार्जिंग होते. एका वेळेचा चार्जिंगचा खर्च दोन ते आठ रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...