आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणाचा दंश:सर्प दंशामुळे महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचे आंदोलन, आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात

अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काठी येथील विवाहितेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मोलगी ग्रामीण रुग्णालयात घडली. सर्प दंशाने नव्हे तर वैद्यकीय अधिकारी यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणाच्या दंशामुळेच या विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईक व परिसरातील शेकडो नागरिकांनी मोलगी ग्रामीण रुग्णालया समोर ठिय्या आंदोलन केले. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर रात्री १२ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. राजेश वसावे यांनी आंदोलक नागरिकांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रात्री अडीच वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करुन रात्री साडे तीन वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत काठी येथे नेला.

काठी येथील निलिमा कुवरसिंग वळवी (वय २२) या विवाहितेला घरात सर्प दंश झाला. तिने घरातील मंडळींना ही बाब सांगितल्यांतर विलंब न करता वाहनांतून नातेवाइकांनी तिला मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉ. चौधरी नामक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यात दाखल करून घेतले. मात्र तिच्यावर योग्य व पुरेसा उपचार न करता ते निघून गेले. तसेच रुग्णालयातील इतर कोणतेही कर्मचारी रुग्णाजवळ उपस्थित नव्हते. त्यामुळे तिची अधिक उपचारा अभावी प्रकृती खालावून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर नातेवाइकांनी ही बाब वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितली असता त्यांनी नातेवाईकांना ऑक्सिजनची तसेच पुढील उपचाराला नेण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. पुढील व्यवस्था होईपर्यंत साडेचार वाजता तिचा मृत्यू झाला. वेळीच वैद्यकीय सुविधा व सेवा मिळाली नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी निष्काळजी पणा केल्यमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात काठी, मोलगी, परिसरातील ३०० ते ४०० नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी यांच्यासह मोलगीचे उपसरपंच कृष्ण वसावे उपस्थित होते. दरम्यान मोलगी पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक धनराज निळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन आंदोलकांसोबत चर्चा केली.

१३ महिन्याची चिमुकली झाली पोरकी : ऑक्सिजनची व्यवस्था व पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ.राजेश वसावे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत निलिमा वळवी यांना अवघ्या १३ महिन्याची मुलगी आहे. त्यामुळे ती पोरकी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...