आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:गटबाजीने संपलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना नव्हे तर कार्यकर्त्यांना भाजपत आणले जावे; बैठकीत मत

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप कार्यकर्ते, नेत्यांच्या मेहनतीवर उभा असलेला पक्ष आहे. गटबाजीमुळे काँग्रेस संपली. त्यामुळे या पक्षातील नेते नाही तर कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी हा व्हिजन नसलेला पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली.

शहरातील अग्रवाल विश्राम भवनात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत हाेते. खासदार डाॅ. सुभाष भामरे, आमदार अमरीश पटेल, आमदार जयकुमार रावल, भाजप युवा माेर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापाैर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, राजवर्धन कदमबांडे, सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, बबन चाैधरी, रवी अनासपुरे, डाॅ. माधुरी बाफना, महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी उपस्थित हाेते.

अजित पवार यांना भाजपत प्रवेशासाठी दिली ऑफर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजी प्रकरणावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस असून ती वेळोवेळी समोर आली आहे. या नाराजी नाट्यानंतर जर कुणी भाजपमध्ये येण्यास तयार असेल तर भाजपचा दुपट्टा नेहमीच तयार असतो, पक्ष प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची अट घातली जाणार नाही, असे बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आदिवासींच्या निधीवर दरोडा टाकला
आदिवासींसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बजेट जाहीर केले हाेते. पण महाविकास आघाडी सरकारने आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागाकडे वळवून या निधीवर दराेडा टाकला. सत्ता गेल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चलबिचल झाले आहे.

शिंदे गटाशी सर्व निवडणुकीत युती
लाेकसभा निवडणुकीत भाजपचे राज्यात ४५ प्लसचे लक्ष्य आहे. शिंदे गटाबराेबर युती करून निवडणुका लढवू. शिंदे गटातील खासदारांच्या लाेकसभा मतदारसंघावर भाजपचा डाेळा नाही. उलट आगामी काळात शिंदे गटाकडून जाे उमेदवार उभा केला जाईल. त्याच्या पाठीशी भाजप असेल असेही बावनकुळे म्हणाले.

२०० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट
आगामी दीड ते दाेन वर्षे निवडणुकीचे असून राज्य व केंद्रात भाजपची सत्ता आहे. पक्षात लहान कार्यकर्त्यालाही चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते. लाेकसभेच्या ४५ तर विधानसभेत २०० जागा मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची तडजाेडीची तयारी
याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून ते म्हणाले की, संवेदनशील घटनेची माहिती पाेलिसांना मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना द्यावी लागते. मुंबईत कबर तयार होत असताना याविषयीची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्हती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी तडजाेड करण्याची तयारी ठेवत होते. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

माेटारसायकल रॅलीने स्वागत : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी महात्मा फुले पुतळ्यापासून माेटारसायकल रॅली काढण्यात आली. खुल्या जीपमधून बावनकुळे रॅलीत सहभागी झाले. मनपाजवळ क्रेनद्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला. रॅलीत महिला फेटा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. रॅलीनंतर सर्व जण अग्रवाल विश्राम भवनात गेले.

बातम्या आणखी आहेत...