आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कापडणेत आजपासून भवानी मातेचा यात्रोत्सव; तीन वर्षांच्या ब्रेकनंतर यात्रेची मोठी उत्सुकता

कापडणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रोत्सवाला ४ मेपासून सुरुवात होत असून अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या या यात्रोत्सवाला कोरोनामुळे तीन वर्षांचा ब्रेक लागला होता. तीन वर्षांनी गावाची यात्रा होत असल्याने मोठी उत्सुकता गावकऱ्यांमध्ये असून यात्रोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

भात नदीपात्रात भरणाऱ्या या यात्रोत्सवासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वच्छता राबवण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भवानी मातेचे जुने मंदिर हे अभिमन पुंडलिक माळी यांनी बांधले होते. या वेळी अतिशय मोठा असा पारही बांधण्यात आला होता. जुन्या मंदिराचा दोन वर्षांपूर्वी गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या प्रयत्नांनी चाळीस लाख रुपये निधीतून जीर्णोद्धार करण्यात आला. नवीन मंदिराचे बांधकाम अतिशय मोठे व दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले आहे.

भवानी मंदिराची महाआरती सरपंच सोनीबाई भिल, उपसरपंच महेश माळी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त सायंकाळी तगतराव फिरवला जाणार असून सायंकाळी लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. तीन वर्षांनी यात्रोत्सव होत असल्याने गावात व यात्रोत्सवाच्या ठिकाणी व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी भोलेनाथ एकतारी भजनी मंडळाच्या वतीने भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थ व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. यात्रोत्सवात पाळणे व सर्व प्रकारचे व्यावसायिक दाखल झाले आहेत. तर कोरोनानंतर प्रथमच यात्रा भरत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...