आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा दिन विशेष:तुम्हीच सांगा आम्ही खेळायचे कुठे; १५१ शाळांना हक्काचे मैदान नाही

अमोल पाटील | धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची पायाभरणी शाळेच्या मैदानात होते. तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असतेे. पण वाढते शहरीकरण व जागेच्या अभावी शाळांचे मैदान आता इतिहास जमा होते आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या २ हजार ११ शाळा असून, त्यापैकी १५१ शाळांना मैदानच नाही. त्यात शहरातील १७ शाळांचा समावेश आहे.

प्रत्येक शाळेत मैदाने असावे असा नियम आहे. शाळेच्या रोजच्या वेळापत्रकात आठवड्यातील दोन ते चार तास खेळाचे असतात पण काही शाळांना मैदानच नसल्याने खेळायचे कुठे असा प्रश्न पडतो. यूडायस प्रणालीत जिल्ह्यातील १५१ शाळांना मैदान नसल्याची नोंद आहे. शहरी भागात काही शाळांना मैदाने तर आहे पण ते अत्यंत लहान असून या ठिकाणी विद्यार्थी सायकल तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वाहन उभी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, धावणे, थाळीफेक, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांचा सराव करता येत नाही. मैदान नसल्याने किंवा ते लहान असल्याने काही शाळांनी आता इनडोअर गेम्सवर भर दिला आहे. पण अशा शाळा कमी आहेत.

नियम काय म्हणतो
आरटीईअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मान्यतेसाठी ११ निकष आहे. त्यात क्रीडांगण व त्याला कुंपण असणे आवश्यक असते. मैदान नसेल तर शाळेला मान्यता देता येत नाही. मैदान तपासणीबाबत शिक्षण विभागाने पडताळणी करणे आवश्यक असते. शाळेच्या मालकीचे मैदान नसेल तर अन्य मैदानात विद्यार्थ्यांना नियमित घेऊन जाणे आवश्यक असते.

मोकळ्या मैदानात खेळण्यास नागरिकांचाही होतो विरोध
काही शाळांना स्वमालकीचे मैदाने नसले तरी शाळेच्या लगत मनपाच्या मोकळ्या जागा आहेत.काही शाळा जागेचा वापर क्रीडा स्पर्धंासाठी करत होत्या. पण आता मनपाने मोकळ्या जागांना संरक्षण भिंत बांधली आहे. तसेच काही कॉलनीतील नागरिक विद्यार्थ्यांना माेकळ्या जागेत खेळण्यास विरोध करतात.

मैदान नसलेल्या सर्वात जास्त शाळा आहे साक्रीत
जिल्ह्यात २ हजार ११ शाळा असून त्यापैकी १ हजार ८६० शाळांना स्वमालकीचे मैदान आहे. तसेच १५१ शाळांना मैदान नाही. त्यात धुळे तालुक्यातील १४, साक्री तालुक्यातील ७०, शिंदखेडा तालुक्यात १५, शिरपूर तालुक्यात ३५ तर मनपा क्षेत्रातील १७ शाळा आहे.

क्रीडा शिक्षक निवृत्तीनंतर पद भरत नसल्याने रिक्त क्रीडा शिक्षक निवृत्त झाल्यावर पद भरले जात नाही. त्यामुळे पद रिक्त आहे. क्रीडा शिक्षकांना इतर कामे लावली जातात. मुळात कला आणि क्रीडा हे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. शिक्षकांची पद भरली जात नसल्याने क्रीडा विकासाला खीळ बसली आहे.

शारीरिक शिक्षणाचा तास आहे कागदावर
काही शाळांना क्रीडांगण नाही हे वास्तव आहे. ज्या शाळेत क्रीडांगण आहे तेथे पार्किंगची सोय असते किंवा नवीन इमारत बांधली जाते. अनेक शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास कागदावर होतो. वर्षातून एकदा प्रत्येक शाळेच्या क्रीडांगणची तपासणी झाली पाहिजे.
डॉ. आनंद पवार, उपाध्यक्ष क्रीडा शिक्षक महासंघ

बातम्या आणखी आहेत...