आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक लाभ:सेवानिवृत्तीच्या दिवशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ ; निवृत्त होणाऱ्यांची माहिती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी किमान सहा महिने आधीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे प्रस्ताव तयार करून सादर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी डिसेंबरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याची सूचना सर्व विभाग प्रमुखांना केली आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनसह सर्व आर्थिक लाभ मिळण्यात विलंब होतो. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदेत हेलपाटे मारावे लागतात. सेवानिवृत्तीच्या प्रकरणाची फाइल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर पोहोचण्यात बराच अवधी निघून जातो. तसेच अर्थ विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फाइल जाणीवपूर्वक अडवली जाते. या प्रकाराला चाप लागावा. तसेच कर्मचाऱ्यांची गैरसोय टळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व आर्थिक लाभ, पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. सर्व विभागप्रमुखांना डिसेंबरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रस्ताव तयार करून प्रकरणे सादर करण्याची सूचना केली.

लाभासाठी मारावे लागणारे हेलपाटे आता थांबणार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये मंजूर वेतन निश्चिती, रजेचा हिशेब, त्रुटी किंवा उणिवा, जादा देणी झाल्याने वसुलीचे आक्षेप, वेतन निश्चिती, आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ, विविध वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतननिश्चिती करणे, सेवानोंद पुस्तकातील सेवाविषय नोंदी तपासणे, कागदपत्रांची तसेच सेवानोंद पुस्तकातील वार्षिक वेतनवाढ, सेवा पडताळणी, इतर नोंदी आदी आर्थिक लाभांच्या बाबींची तपासणी करावी लागते. त्यासाठी मोठा कालावधी जातो. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास विलंब होतो. तसे होऊ नये यासाठी हा निर्णय झाला आहे.

प्रकरण वेळेत निकाली निघेल ^जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ दिले जातील. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांची माहिती मागवली आहे. बुवनेश्वरी एस, सीईओ, जि. प.

बातम्या आणखी आहेत...