आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलजीवन मिशन:541 कोटी रुपये खर्चाच्या नवीन 1034 पाणी योजना; टंचाईच्या झळा होणार कमी

नंदुरबार6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आचारसंहिता असलेली गावे वगळून जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १हजार ३४ पाणीपुरवठा योजनांच्या सुमारे ५४१ कोटी २० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन झाले. यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा कमी होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या पाणीपुरवठा योजनांचा ई-भूमिपूजन सोहळा मंत्री पाटील यांच्या हस्ते नंदुरबार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे झाला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती सुहास नाईक, शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, पशुसंवर्धन व कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ, जि.प. लघु सिंचनचे कार्यकारी नीलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता एस.सी.निकम आधी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक योजना
शहाद्यातील १३९ पाणीपुरवठा योजनेचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. तळोद्यातील ८९ पाणीपुरवठा योजनांचे जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, नवापूरमधील २१४ योजनेचे खासदार डॉ. हीना गावित, नंदुरबारमधील ७६ योजनांचे आमदार आमश्या पाडवी तर अक्कलकुवा तालुक्यातील ५१९ योजनांचे ई-भूमिपूजन जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते झाले.

२०२४ पर्यंत कामे पूर्ण करण्याचा मानस
वर्ष २०२४ पर्यंत जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण करण्याचा मानस असून राज्यात ३२ हजार गावांपैकी २२हजार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. जलजीवन मिशनची कामे जलदगतीने होण्यासाठी ठेकेदार व पुरवठादारांची संख्या वाढवण्यात येऊन त्यांना कामे सुरू करताना १० टक्के रक्कम अग्रीम देण्यात येत आहे. ठेकेदारांनी योजनेची कामे वेळेत व दर्जेदार करावीत, असेही मंत्री पाटील म्हणाले.

जलदूत पुरस्कार देऊन करणार सन्मानित
राज्यातील सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, व अभियंत्यांना जलदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी दिली.

आरोपांकडे दुर्लक्ष जनतेकडेच लक्ष
आपण विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. जल जीवन मिशन योजनेत जे आडवे येतील, त्यांचा सत्यानाश होईल, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाहीर सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...