आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकक्षेतील धुळे जिल्ह्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ अशा २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीसाठी ११५ कोटी ३ लाख २० हजार ३११ रुपये विशेष दुरुस्तीच्या कामांना अटींसह सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. २२ उपसा सिंचन योजना पुन:कार्यान्वित केल्यास ९०.५० दलघमी पाणी सिंचनासाठी वापरात येणार असून, १४ हजार ४१३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होऊन ५९ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील ६४ उपसा सिंचन योजनांसाठी तापी नदी उद्भव होता. तापी खोऱ्यामध्ये उर्ध्व भागात प्रकल्प पूर्ण होत गेल्यामुळे पाणी वरच्या भागात अडवले गेले. त्यामुळे नदीतील प्रवाह कमी होत गेला. ज्या योजना पूर्णपणे उभारून कार्यान्वित झाल्या होत्या, त्यांच्या उद्भव ठिकाणी पाणी अपुरे पडत गेल्यामुळे योजनावरील सिंचित क्षेत्र कमी झाले व सदर योजना हळूहळू बंद पडल्या. सन २००७-०८ मध्ये तापी नदीवरील प्रकाशा (६२.११ दलघमी),सारंगखेडा(९१.८१ दलघमी). बॅरेजेसच्या माध्यमातून १५३.९२ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला.त्यातून साधारण १७.२८ दलघमी पाण्याचा वापर सुरू झाला आहे.दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण १३६.६४ दलघमी पाणी विनावापर राहिल्याने वाया जाते.
परिसरातील भौगोलिक स्थितीमुळे तेथे उपसा सिंचन योजनेशिवाय पाणी शेतीपर्यंत पोहोचणे शक्य नाही. सन २००७-०८ पासून प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये पाणी अडवले गेल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व लाभधारकांकडून धुळे जिल्ह्यातील ८ नंदुरबार जिल्ह्यातील १४ अशा २२ उपसा सिंचन योजना शासनामार्फत दुरुस्त करून पुन:कार्यान्वितसाठी मागणी करण्यात आली. सदर २२ उपसा सिंचन योजना पुन:कार्यान्वित केल्यास ९०.५० दलघमी पाणी सिंचनासाठी वापरात येणार असून, १४ हजार ४१३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होऊन ५९ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सदर बाब विचारात घेता विशेष दुरुस्तीअंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन २२ उपसा सिंचन योजना पुन:कार्यान्वित करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या ३ मे, २०१६ च्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. ही मान्यता विचारात घेता धुळे जिल्ह्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ अशा २२ राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामाना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, अशी माहिती मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली.
तापी पाटबंधारेकडून दुरुस्तीची कामे
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या तरतुदीनुसार निर्धारित केलेल्या अटी व शर्तीनुसार, महामंडळाने केलेल्या खर्चाची संपूर्ण रक्कम मिळाल्यावर सहकारी उपसा सिंचन योजना संस्थांकडे परत सोपवण्यात याव्यात. योजना पुनर्जीवित करण्यासाठी केलेल्या खर्चाची संबंधित संस्थेकडून परतफेड करण्याबाबतचा तपशील महामंडळ स्तरावर निश्चित करावा, योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत पूर्ण करावीत. स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी घटकनिहाय मंजूर तरतुदीच्या मर्यादित खर्च राहील याची जबाबदारी महामंडळावर राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.