आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणादाण:तासाभरात 12 मिलिमीटर पाऊस; गहू, कपडे, कागदपत्रांचे नुकसान, पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना आवश्यक

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र वाघेश्वरी पायथ्याशी असलेल्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान होऊन हाल झाले. तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. शहरातील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सुरू होता. तर एक तासात १२ मिलिमीटर पावसाची कोळदा कृषि विज्ञान केंद्रांत नोंद करण्यात आली.

शहरात दिवसभर ढगाळ वातावरणासह ढगांचा गडगडाट सुरू होता. दिवसभर उकाडा सहन करीत उन्ह-सावल्यांचा खेळ अनुभवास मिळाला. उन्हाच्या तीव्र प्रकाशात पांढरे शुभ्र ढग आकाशात तरंगतानाचे दृश्य अनेकांनी मोबाइलमध्ये कैद केले. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर उतरला. त्यानंतर ज्यांच्या घरात पाणी शिरले असे सर्व नागरिक आपल्या घरातून बाहेर पाणी काढत होते. तर टेकड्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी पावसाचे पाणी घरात घुसू नये, यासाठी मातीच्या ढिगाऱ्यांचा आडोसा तयार केला. मात्र मुसळधार पावसाने तीन घरात पाणी शिरले. त्यामुळे गहू, कपडे, कागदपत्रांचे नुकसान झाले. भात व कापसाच्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, बियाणे व खते घेण्यासाठी खासगी विक्रेत्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली.

मान्सूनचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन झाले. वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुक्यात नुकसान झाले. नंदुरबार शहरात दिवसभरात तुरळक पाऊस पडला. सायंकाळी तासभर पडलेल्या पावसामुळे शहरात अनेक घरात पाणी शिरले. कृषी विभागाच्या वतीने तालुका स्तरावर आढावा घेण्यात आला. तसेच पीक पेरणीचा अहवाल ऑनलाइन भरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सोमवारपर्यंत जिल्ह्यातील पीक पेरणीची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी न भरल्याने कृषी विभागाला माहिती देता आला नाही.

शहराचा हा भाग झाला जलमय
मंगळबाजारात नाला तुंबल्याने तसेच काही गटारी चोकअप झाल्याने पाणी दुकानात शिरले. त्यामुळे आपला माल खराब होऊ नये,सर्वच व्यापारी दुकानातून बाहेर पाणी काढत होते. शास्त्री मार्केट, गणपती मंदिर परिसरात पाणी साचले. त्यामुळे या भागात वाहनधारकांना गाडी चालवणे अवघड झाले. बटेसिंगभय्या व्यापारी संकुलाच्या रस्त्यावर प्रचंड पाणी साचले. शनि मंदिर परिसर, जिजामाता रोड या भागात पाणी साचले. तसेच चारचाकी, दुचाकी वाहने पावसात बंद पडली.

ठेकेदाराच्या चुकीने घरात शिरले पाणी
वाघेश्वरी कॉलनीत ठेकेदाराने रस्ता तयार केला, मात्र काही भागात उतार पद्धतीने रस्ता बांधला. त्यामुळे घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. घरात पूर्णपणे गारा, माती शिरली. भोई गल्लीत पावसाचा लोंढा वाहू लागला. झोपडपट्टी, गवळी वाडा तसेच छोट्या मोठ्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

बातम्या आणखी आहेत...