आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर तालुक्यातील नवरंग गेटजवळ कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ५ डिसेंबर रोजी रात्री १.१५ वाजेच्या सुमारास पकडण्यात आलेल्या व तुरुंगातून फरार झालेल्या पाच आरोपींपैकी एका आरोपीने चंदन चोरीची कबुली दिली. मंगळवारी आणखी तिघांना मध्य प्रदेश राज्यात जावून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे चंदन व वाहन जप्त करण्यात आले. पाेलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी गौसखॉ हानिफखॉ पठाण हा सराईत गुन्हेगार असल्याने त्यास अधिक विचारपूस केली. त्याने सप्टेंबर २०२२ मध्ये नवापूर येथे त्याच्या वरील साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून ते इतर साथीदारांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर, रा.गवाडी, ता.जि. सेंधवा (मध्य प्रदेश) यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तत्काळ एक पथक तयार केले.
आणि बडवाणी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर यांच्या मालकीच्या एस.बी. अरोमॅट्रिक्स फॅक्टरीला भेट दिली. पथकाने संपूर्ण फॅक्टरीची पाहणी केली असता १७ लाख ७२ हजार रुपये किमतीचे २६.०२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकूड वाहतुकीसाठीचे ७ लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे वाहन क्रमांक एमएच ४६ बीएफ ०५४३ असा एकूण २८ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अब्दुल रहेमान अब्दुल कादर (वय ५८), सौदागर सहदेव कोलते (वय ४६) व उमेश विलास सूर्यवंशी (वय ४०) दोन्ही रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर अशी या आराेपींची नावे असून त्यांना चंदन चोरी प्रकरणी ताब्यात घेतले.
या पथकाने केली अटकेची कारवाई
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उप निरीक्षक अशोक मोकळ, पोलिस हवालदार दिनेश वसुले, पोलिस नाईक योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे, पोलिस अंमलदार गणेश बच्छे, परमानंद काळे, दिनेश बाविस्कर तसेच एलसीबी पोलिस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलिस अंमलदार अभय राजपूत यांच्या पथकाने केली.
महाराष्ट्रासह तीन राज्यांत गुन्ह्याची व्याप्ती
गौसखाँ पठाण याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून चंदनाच्या झाडाचे तुकडे चोरी करुन आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातील आणखी काही चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून त्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून या तिन्ही राज्यातील चंदन चोरीचे बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.