आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळरात्र:वळणावर ब्रेक फेल झाल्याने चरणमाळ घाटात बस काेसळली, २ ठार, ३१ जखमी ; उपजिल्हा रुग्णालयात तातडीने केले उपचार

नवापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात तीव्र वळणावर शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह बालिका ठार झाली आहे. अपघातातील ३१ जखमींमध्ये तिघे गंभीर जखमी असून उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींच्या संख्येतही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गंभीर प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान अपघातानंतर रात्री उशीरापर्यंत खाजगी व सरकारी डाॅक्टरांनी जखमींवर उपचार केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून खाजगी बस वळणावर अनियंत्रित झाल्याने ती दरीत कोसळली. यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते. अचानक बस कोसळल्याने लहानग्यांसह महिलांचा प्रचंड आक्रोश सुरू हाेता.वैद्यकीय सेवा केल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.

सटाण्याची दीड वर्षांची बालिका ठार
बस (क्रमांक जीजे ०३ डब्ल्यू ९६२७) एकूण ५५ प्रवासी घेऊन सटाण्याकडून गुजरात राज्यात जुनागडला जात हाेती. अपघातात बस खाली अडकलेल्या चालकास जेसीबीच्या साहाय्याने मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्यात यश आले. परंतु त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. अफजल मुसाभाई सोडा (वय ४५) रा.जुनागड बिलदा असे या चालकाचे नाव आहे. तर दीड वर्षांची बालिका अश्विनी सुरेश माळी, रा.नीताने, ता.सटाणा हीचाही मृत्यू झाला. रुग्णांना उपचारासाठी शहरातील डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी या डॉक्टरांचे कौतुक केले.

मंजुरीअभावी घाटाची दुरुस्ती झाली नाही
बजेटमध्ये चरणमाळ घाट दुरुस्ती कामासाठी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याद्वारे पत्र सादर केले आहे. विभागाकडून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवला. परंतु मंजुरी न मिळाल्याने घाटाची दुरुस्ती झाली नाही. पुन्हा वरिष्ठ कार्यालयात तत्काळ प्रस्ताव सादर करून लवकरात घाटाची दुरुस्ती करण्यात येईल. बॅरिकेडिंग अत्यावश्यक आहे. रात्री चालक गाड्या न्यूट्रल करून उतरवत असल्याने अनियंत्रित होतात. तसेच तीव्र उतारामुळे ब्रेक फेल होत असल्याने रात्री अपघात होतात. घाट कटिंग करून दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
नितीन पाडवी, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नवापूर.

बाेरझरचे ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावले
अपघातस्थळी नवापूर, विसरवाडी, प्रतापपूर येथील रुग्णवाहिका तसेच खाजगी रुग्णवाहिकाही मागवून तत्काळ रुग्णांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात येथे सरकारी व खाजगी रुग्णवाहिकांद्वारे पोहाेचवण्यात आले. डाॅ हेमंत सोनार, लाजरस गावीत, विनय गावीत, विनोद देसाई, प्रवीण गावीत आदींची मोठी मदत केली. तसेच घाटात अपघातानंतर बोरझर गावातील पोलिस पाटील, ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावले. नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पाेेहाेचले हाेते. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नवापूर येथील युवक व नागरिक मदतीला धावून आले. रुग्णांना बिस्किट ,पाणी वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हाेती.

घाट दुरुस्त केला जाईल
चरणमाळ घाटात झालेल्या अपघाता संदर्भात प्रत्यक्ष चरणमाळ घाटात जाऊन पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ घाट दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाशी स्वतः संपर्क करून तत्काळ घाट दुरुस्तीचा निधी मंजूर केला जाईल.
शिरीषकुमार नाईक, आमदार.

बातम्या आणखी आहेत...