आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप:2021 सायंकाळी 5 पर्यंत विसर्जन 2022 सकाळी 6 पर्यंत मिरवणुका; डीजे, डाॅल्बीमुक्त मिरवणुका, 8 ट्रॅक्टर गुलाल केला गोळा

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानाचा श्री दादा गणपतीसह जिल्ह्यात श्रींची विसर्जन मिरवणूक हर्षाेल्हासात पार पडली. तब्बल २० हून अधिक तास मिरवणूक चालली. रात्री १२ वाजेला श्री दादा व श्री बाबा गणपतीची हरीहर भेट झाली. मिरवणुकीत महिलांचे नृत्य हे यंदाचे विशेष आकर्षण ठरले. डिजे व डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्यात आला. दोन वेळा वरुण राजाच्या जलाभिषेकाने गणेश भक्तांना उत्साह वाढवला. सकाळी ६ ते ८ या दरम्यान श्रींचे विसर्जन करण्यात आले. तर गेल्या वर्षी सायंकाळी ५ वाजताच विसर्जन झाले होते. दुसऱ्या टप्प्यातही गुलालाची उधळण करण्यात आली. पालिकेने दुसऱ्या दिवशी ८ ट्रॅक्टर गुलाल गोळा केला.

मानाचा श्री दादा, श्री बाबा, श्री तात्या, श्री काका, खासगी दादा गणपती, नीळकंठ, श्री शक्तीसागर, भोई राज मित्र मंडळ,स्वामी विवेकानंद, न्यू अमर, नंदराज, संतसेना मित्र मंडळ, भाऊ, मामा, पवनपुत्र, गुजराथी, डुबकेश्वर,साक्री नाका परिसर, संत कबीरदास भोळा बजरंग, जयदत्त व्यायाम शाळा, शिवणी मित्र मंडळ ,श्री अंबिका मित्र मंडळ आदी मंडळांनी पारंपरिक वाद्यात गुलालांची उधळण करीत गणेशाची विसर्जन मिरवणूक शिस्तीत काढली. तब्बल दोन किमी भाविकांची गर्दी होती. एकामागून एक गणेश मंडळांची रांग तसेच पारंपारिक पध्दतीने सर्वांनी नृत्य करीत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. तसेच तोफेच्या सहाय्याने कागदी फुले उधळण्यात आली. रंगेबेरंगी विद्युत रोषणाईने मिरवणूक अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ रवींद्र चौधरी आदी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लेझीम नृत्यात सहभागी झाले. श्री महाराणा प्रताप मंडळाच्यावतीने साहसी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. माजी नगरसेवक छाेटूलाल श्रावण माळी यांच्या निधनामुळे माळी समाजाने साध्यापध्दतीने विसर्जन मिरवणूक काढली.

२ किमीपर्यंत मंडळांच्या रांगा
अनंत चतुर्दशीच्या सकाळी १० ला श्रींच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. वेगवेगळया मार्गाने आलेल्या गणेश मंडळांनी मात्र मंगळ बाजारातून एका रांगेत आपले गणेश मित्र मंडळाची वाहने लावली. त्यामुळे दोन किमी पर्यंत गणेश मंडळांच्या रांगा होत्या. सायंकाळी ७ वाजून ३९मिनिटांनीपाऊस पडला. त्यामुळे गणेश भक्तांची तारांबळ उडाली. गणेश मुर्ती झाकण्यासाठी मंडळांनी छत्री,प्लास्टीकचे आच्छादन अशी पर्यायी व्यवस्था केली.त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मिरवणुकीचा उत्साह कायम राहिला.

स्वागत आणि जपला सेवाभाव
चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपगराध्यक्ष कुणाल वसावे, कैलास पाटील गजेंद्र शिंपी, हिरालाल चौधरी आदींनी मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच कार्यकर्त्यांना भगवे स्कार्पचे वाटप केले. लायन्स क्लबच्यावतीने १० हजार गणेश भक्तांना खिचडी वाटप करण्यात आले. अध्यक्ष सतीश चौधरी, शीतल चौधरी, आनंद रघुवंशी, हिना रघुवंशी, राजेंद्र माहेश्वरी, राहूल पाटील, उद्धव तांबोळी आदीं पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. काहींनी वैयक्तिकरित्या पाण्याचे जार बाहेर ठेवून गणेश भक्तांची तृष्णा भागवली.

हरिहर भेटला आधुनिक टच
सायंकाळी ७.३० ते ८.३० च्या दरम्यान जळका बाजार चौकात श्री दादा गणपती व श्री बाबा गणपती यांची मिरवणूक आली. रात्री १२ वाजता हरीहर भेट सोहळयाला सुरुवात झाली. या वेळी गणेश भक्तांची मोठी उपस्थिती होती. ड्रोन कॅमेराने हरीहर भेटीचे दृष्य चित्रित करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. साधारण आठ हजार पेक्षा अधिक भक्तांनी हरीहर भेटीचा दर्शन सोहळा पाहिला. हरीहर भेटीला आधुनिक टच देण्याचा प्रयत्न यंदा झाला.

बातम्या आणखी आहेत...