आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळमळ:203 आदिवासी मुले-मुली अभ्यासात‎ केली पारंगत; आणले शिक्षण प्रवाहात‎

रणजित राजपूत |‎ नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका विधायक समितीच्या‎ माध्यमिक आश्रम शाळेतील अनिता‎ पाटील या शिक्षिकेने वेध प्रकल्पात‎ स्वत:ला झोकून देत दोन वर्षांत तब्बल‎ २०३ आदिवासी मुला-मुलींना‎ शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. या‎ मुलांना वाचन, लिखाण, पाढे‎ म्हणण्यात पारंगत केले. आश्रम शाळा‎ म्हणजे राहण्याचे आणि खाण्याचे‎ ठिकाण, असा दृष्टीकोन समाजाचा‎ आहे.

तो वेध प्रकल्पामुळे बदलण्यात‎ शिक्षिकेला यश मिळाले. त्या आता या‎ विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका‎ झाल्या आहेत.‎ खोडाईमाता रोडवर समितीची‎ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम‎ शाळा आहे. तेथे इयत्ता पाचवी ते‎ सातवीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण‎ घेतात. सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल‎ करनवाल यांनी जिल्ह्यातील‎ आदिवासी आश्रम शाळांतील‎ शिक्षणाची विदारक स्थिती‎ सुधारण्यासाठी वेध प्रकल्पाची सुरुवात‎ केली. त्यासाठी सर्वच आश्रम‎ शाळेतील शिक्षकांना, शिक्षणाची‎ परिस्थिती सुधारून दाखवाच,‎ असे आव्हान दिले.

वेध प्रकल्प सुरू‎ झाल्यानंतर त्यातून सकारात्मक परिणाम‎ दिसला. जिल्ह्यात शासकीय,‎ निमशासकीय ६१ आश्रम शाळा असून‎ यात नंदुरबार तालुका विधायक‎ समितीच्या शिक्षिका अनिता पाटील यांनी‎ वेध प्रकल्पाचे एक दिवसाचे प्रशिक्षण‎ घेतल्यानंतर स्वत:स या प्रकल्पात झोकून‎ दिले. परिणामी २०३ विद्यार्थ्यांना आता‎ उत्तम लिहिता, वाचता येऊ लागले आहे.‎

हे विद्यार्थी गणितही तेवढ्यात तन्मयतेने‎ सोडवतात. त्यामुळे अनिता पाटील यांना‎ शिक्षिकी पेशात काम करताना नवा हुरूप‎ मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेत‎ गतवर्षी प्रजासत्ताक दिनी सहाय्यक‎ जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या‎ हस्ते त्यांचा गाैरवही करण्यात आला‎ हाेता. अनिता पाटील यांच्यापासून‎ इतरांना प्रेरणा मिळण्याची अपेक्षा आहे.‎

अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाची गाेडी‎
कोरोना काळात विद्यार्थी अभ्यासात कच्चे होते. वेध प्रकल्पामुळे हे विद्यार्थी‎ शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले. मुख्याध्यापक पी.सी. पाटील यांचे सहकार्य‎ लाभले. करण धर्मा जगताप, गायत्री गुलाब जगताप, भावना कोकणी या‎ विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी आल्या. त्यांना काहीच येत नव्हते. मात्र आज‎ त्यांना शिक्षणाची गोडी लागल्याने मी समाधानी आहे.‎ अनिता बापूराव पाटील, शिक्षिका, नंदुरबार.‎

विद्यार्थ्यांशी चर्चेतूनच विद्यार्थी‎ शिकतात गणित‎
शिक्षिका अनिता पाटील या आता सहावीच्या‎ विद्यार्थ्यांना ‘वेध’च्या माध्यमातून शिक्षण‎ देत आहेत. समजपूर्वक वाचन, स्वत:‎ मुलांनी शिकावे, शिक्षकाची केवळ‎ मार्गदर्शनापुरती मदत, प्रारंभिक गट, अक्षर‎ गट, शब्द गट, परिच्छेद गट अशा गटांत‎ विद्यार्थ्यांची विभागणी केली जाते. गणितात‎ एक ते नऊ पाढा, १० ते ९९ पाढा, यानंतर‎ गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा‎ पद्धतीने गणित विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना‎ चर्चेतून शिकवले जातात. हुशार विद्यार्थी‎ शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यास‎ शिकवतो. यात मैत्रीपूर्ण भाव निर्माण होऊन‎ विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असल्याचे‎ वेध प्रकल्पात दिसले.‎

बातम्या आणखी आहेत...