आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा यात्रा:लाकडी बैलगाड्यांच्या विक्रीमध्ये 40 टक्के घट; हाेणारा खर्चही निघेना

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा यात्रेत यंदा लाकडी व लोखंडी बैलगाड्यांची मागणी घटली आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक व्यापारी बैलगाड्यांचे सुटे भाग आणतात. सारंगखेड्यात ते सुटे भाग जोडून बैलगाडी तयार करतात. यंदा लाकडी व लोखंडी अशा दोन्ही बैलगाड्यांना मागणी कमी झाल्याने यात्रेसाठी झालेला खर्चही भागणार नसल्याचे तसेच नफा मिळण्याचीही शक्यता कमी झाली आहे. चार वर्षांपासून विक्रीत सुमारे ४० टक्के घट झाली. ट्रॅक्टरच्या वापरात वाढ यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा यात्रेत लाकडी बैलगाड्यांची किंमत २२ हजार ते २६ हजार रुपये एवढी आहे. तिवसाच्या लाकडापासून बनवण्यात आलेल्या या मजबूत लाकडी गाड्यांना मात्र पूर्वीपेक्षा कमी मागणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांत बैलगाड्यांचा हा बाजार बंद तर होणार नाही ना, अशी भीती यापूर्वी कधी नव्हे ती यावेळी व्यक्त केली जात आहे. १० वर्षांपूर्वी ७० व्यापारी बैलगाडे विक्री करण्यासाठी सारंगखेडा यात्रेत दाखल होत असत. अलीकडे चार-पाच वर्षांपासून व्यापाऱ्यांची संख्याही २० वर आली आहे. काेराेना काळातील लॉकडाऊनमध्ये बैलगाड्यांची विक्री कमी झाली हाेती. त्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्यानेही बैलगाडे विक्रीवर परिणाम जाणवत आहे.

धुळे तालुक्यातील मुकटी येथील गुलाब आधार मिस्त्री यांनी २० लोखंडी गाडे विक्रीसाठी आणले होते. त्यापैकी पाच गाड्यांची विक्री झाली. गाडयांच्या विक्री करणाऱ्यांत सोनगीर (ता.धुळे) व पारोळा (जि.जळगाव) यांची मक्तेदारी आहे. पूर्वी याच सारंगखेडा यात्रेत एरंडोल, धरणगाव, चिमठाणे येथील व्यापाऱ्यांची गर्दी असायची. पाच वर्षांपूर्वी बैलगाड्यांना बऱ्यापैकी मागणी होती. दहा बैल गाड्या विक्री करून आम्ही घरी जायचो. हल्ली दोन ते पाच गाड्या विक्री होते. साधारण ६० ते ७० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

घटती विक्री; बैलगाडी बाजार संपुष्टात येण्याची भीती
किशाेर वसंत लोहार हे गेल्या ३० वर्षांपासून सारंगखेडा यात्रेत गाडे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पूर्वी संपूर्ण खान्देशातून शेतकरी येथून बैलगाडी नेत असत. मात्र अलिकडे गाड्यांची विक्री कमी होत चालली आहे. त्यामुळे पुढे जावून बैलगाड्यांच्या विक्रीचा बाजार जवळपास संपुष्टात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेत बैलगाडी विक्री आता परवडत नाही
अमळनेरचे हनुमान टिंबर मार्टचे संचालक दिलीप एकनाथ बागड यांच्याकडून तिवस लाकूड उधारीने घेताे. ते गाडे विक्री झाल्यावर व्यापारी फेडतात. १० बैलगाडे विक्रीसाठी आणले. केवळ दाेनच गाड्यांची विक्री झाली. गाड्याचे सुटे भाग आम्ही वाहनातून यात्रेच्या ठिकाणी आणतो. त्यानंतर यात्रेत त्या भागांची जुळणी करून गाडे तयार करतो. तिवसाचे लाकूड सध्या ६०० रुपये घनफूट दराने मिळते. कच्चा माल आणून गाडे तयार करतो. परिश्रम, खर्च व सारंगखेडा यात्रेत रहावे लागते. हा सर्व खर्च धरला तर यात्रेत आता गाडे विक्री परवडत नाही.-सुधाकर सदाशिव आंबेकर, पारोळा, जि.जळगाव.

बातम्या आणखी आहेत...